वाहनाचा विमा घेताना...
   दिनांक :29-Apr-2019
गाड्यांना आग लागण्याचं प्रमाण सध्या बरंच वाढलं आहे. रस्त्यावरून चालत असताना गाडी अचानक पेट घेण्याच्या घटना मध्यंतरी घडल्या. पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या जळून खाक झाल्या. अलिकडेच बंगळुरूतल्या ‘एअरो शो’ दरम्यान पार्क केलेल्या गाड्यांना आग लागल्याने मोठं नुकसान झालं. अशा परिस्थितीत एकच गोष्ट आपल्याला मदतीचा हात देऊ शकते. ती म्हणजे वाहन विमा. अशा वेळी सर्वांगिण किंवा सर्वसमावेशक वाहन विमा उपयुक्त ठरतो. आगीमुळे झालेल्या नुकसानाच्या दाव्यांची भरपाई करण्यासाठी विमा कंपन्या गाडीचं नोंदणी प्रमाणपत्र रद्द होईपर्यंत म्हणजे साधारण एक ते दोन महिने थाांबतात. मात्र हे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठीच्या अर्जाची प्रत दाखवूनही दावा निकाली काढता येतो.
 
 
 
त्यातच ‘एअरो शो’सारख्या सार्वजनिक कार्यक्रमातली अप्रिय घटनाा असेल तर विमा कंपन्या घटनेचा तपासही करत नाहीत. झटपट होणार्‍या या प्रक्रियेमुळे नुकसानभरपाई मिळण्याचा कालावधी खूप कमी झाला आहे. ही बाब गाडीमालकांच्या पथ्यावर पडताना दिसते आहे. मात्र आगीमुळे झालेल्या नुकसानासाठी दावा करताना काही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. गाडीची सर्वसमावेशक(कॉम्प्रिहेन्सिव्ह) पॉलिसी असायला हवी.
 
थर्ड पार्टी विमा संरक्षण असेल तर नुकसानभरपाई दिली जात नाही. गाडीला मिळणार्‍या विमा संरक्षणाची रक्कम इन्शुअर्ड डिक्ल्यर व्हॅल्यू (आयडीव्ही)वर ठरते. आयडीव्ही गाडीच्या वयावर अवलंबून असते. नव्याने नोंदणी केलेल्या वाहनाच्या तुलनेत काही वर्षांपूर्वी नोंदणी केलेल्या वाहनाची आयडीव्ही कमी असते. त्यामुळे नुकसानभरपाईच्या रकमेने नवी गाडी खरेदी करताना मालकाला अडचणी येऊ शकतात.