भारतीय वंशाच्या तिघांविरुद्ध आरोपपत्र
   दिनांक :03-Apr-2019
वॉशिंग्टन:
 'एच-1 बी’ व्हिसा मिळवण्यासाठी बनावट अर्ज दाखल करून गैरव्यवहार करणार्‍या भारतीय वंशाच्या तीन जणांवर मंगळवारी अमेरिकेमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. किशोर दत्तापुरम, कुमार अश्वपती आणि संतोष गिरी अशी तीन आरोपींची नावे आहेत.
 
 
’एच-1 बी’ व्हिसा मिळवणार्‍या भारतीय तंत्रज्ञांना अमेरिकेमध्ये निवासाची; तसेच नोकरी करण्याची परवानगी मिळते. आपल्या कर्मचार्‍यांना हा व्हिसा मिळवून देण्याकरीता कंपन्यांना अमेरिकेच्या सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस केंद्राकडे ’आय-१२९’ याचिका दाखल करणे अनिवार्य असते. या याचिकेमध्ये संबंधित कर्मचार्‍याच्या नोकरीचे स्वरूप, त्याचा कालावधी, वेतन यांसह इतर महत्त्वाची माहिती नमूद करावी लागते. तिघा आरोपींवर दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार त्यांनी सँटा क्लारा येथे नॅनोसेमँटिक आयएनसी नावाची सागार संस्था स्थापन केली होती. या संस्थेमार्फत ते परदेशी कर्मचार्‍यांतर्फे ’एच-1 बी’ व्हिसासाठी अर्ज दाखल करायचे व त्यासाठी बनावट ’आय-१२९’ याचिका सादर करून अशा व्हिसाधारकांना स्थानिक कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देत होते. अशाप्रकारे त्यांना वैध मार्गाने व्हिसा मिळवून देणार्‍या  सागार संस्थांपेक्षा अधिक फायदा मिळत होता. अमेरिकन कायद्यानुसार या तिघांविरुद्ध आरोपपत्रामध्ये व्हिसा फसवणुकीची दहा कलमे लावण्यात आली आहेत. मागील आठवड्यात या तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान, या तिघांनीही आपल्यावरील आरोप अमान्य केले असून जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ मे रोजी होणार आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास या तिघांना दहा वर्षे शिक्षा आणि अडीच लाख डॉलरचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो.