अमेरिकेत भारतीयाला आठ वर्षे कारावास
   दिनांक :03-Apr-2019
 वॉशिंग्टन : 
 मिरा रोड येथील कॉल सेंटर घोटाळ्याद्वारे अमेरिकी नागरिकांना घातलेल्या कोट्यवधींच्या गंड्याप्रकरणी निशितकुमार पटेल (३१) या भारतीयाला फ्लोरिडा न्यायालयाने सोमवारी आठ वर्षे आणि नऊ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली असल्याचे अमेरिकेच्या न्याय विभागाने सांगितले. त्याशिवाय दोन लाख अमेरिकी डॉलर तसेच ऑक्टोबर २०१८ मध्ये जप्त करण्यात आलेली २०१५ लँड रोव्हर ही कारदेखील जमा करण्याचे आदेश न्यायालयाने निशितकुमारला दिले आहेत.
 
 
 
या कॉल सेंटर घोटाळ्याप्रकरणी निशितकुमारने ९ जानेवारी रोजी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. अमेरिकेत राहणार्‍या निशितने सरकारच्या अंतर्गत महसूल सेवा (आयआरएस) विभागाचा अधिकारी बनून २०१४ ते २०१६ या कालावधीत अमेरिकेतील काही सहकार्‍यांच्या मदतीने आणि भारतातील बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकी नागरिकांना गंडा घातला. फसवणूक झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.
 
दलाल आणि अन्य सूत्रांमार्फत माहिती मिळवून अमेरिकेतले संभाव्य सावज हेरले जाई. भारतातील बोगस कॉल सेंटरमधून या नागरिकांना कॉल जात असे आणि तो कॉल ’आयआरएस’च्या अधिकार्‍यांकडून आल्याचे भासवले जात होते. ’आयआरएस’कडे संबंधित नागरिकाचे काही कर देणे बाकी असल्याचे सांगून तो न भरल्यास अटक करण्याची तसेच जबर दंड भरावा लागण्याची भीती या अमेरिकी नागरिकांना दाखवले जायचे. तसेच त्यांच्याकडून प्रीपेड डेबिट कार्ड किंवा ऑनलाइन ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे उकळले जायचे.