बहुगुणी डाळिंब
   दिनांक :03-Apr-2019
 
 
डाळिंब हे फळ प्रत्येकाच्या आवडीनिवडीचे असल्याने गरिबातील गरीब आवडीने खात होते. पण, आता हे फळ बागायतीने जागा घेतल्यामुळे सर्वसामान्यांना खाण्यासारखे राहिले नाही. ते फक्त श्रीमंतांचे फळ झाले आहे. तसेच या फळाला बाहेरील देशात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने व या फळापासून अनेक प्रकारची औषधे, तसेच कपड्याला रंग देण्यापासून तर अनेक प्रकार बनविले जातात. त्यामुळे या पिकाला नगदी पीक म्हणून बघितले जात असल्याने याची मोठ्या प्रमाणात शेतात लागवड केली जात आहे.
 

 
 
आधी लोक आवडीने परसात एक तरी झाड लावत होते व या झाडापासून घरच्यांना आस्वाद घेता येत होता. आस्वाद घेणे एवढाच उद्देश नव्हता, तर जेवणानंतर अपचन झाले असल्यास, उन्हाळी लागली असल्यास, दंतमंजन करण्याकरिता, तसेच अंगाला खूप घाम येत असल्यास, तसेच महिलांच्या अनेक प्रकारच्या आरोग्यावर या  डाळिंबच्या झाडाच्या पानफुलांचा, सालीचा व मुळांचा वापर केला जात होता. डािंळबाचे फळ मोहक असल्याने राजे-महाराजे आपल्या पत्नीला लालचुटूक असलेले अनार दुरवरून आणून देत होते म्हणूनच या फळाला अनार हे नाव पडले. अशा अनार झाडाची लागवड आवडीने परसात केली जात होती. पण, आता घराच्या परसात वाढणारे अनार नष्ट झाले आहे. त्यामुळे वर्षभर फुलाने बहरून घराची शोभा वाढवणारे व अनेक प्रकारच्या वनौषधी उपयोग असणारे हे झाड परसातून कायमचे हद्दपार झाले आहे. अशा हद्दपार झालेल्या व पंचतत्त्व असलेल्या नैसर्गिक डािंळब झाडाची लागवड आपल्या परसात आवर्जून किमान एक तरी झाड लावून करावीच.
डाळिंबाच्या पान, फळांचा व खोडाचा उपयोग : औषधात वापरले जाणारे डाळिंबाच्या झाडाचे भाग म्हणजे खोडाची साल, पाने, फुले, फळांची साल व बिया हे होत. हे फळे चवीला गोड, तुरट असे असते. आंबट चवीचे असूनही शरीरातील पित्तास वाढवीत नाही हे महत्त्वाचे. पित्ताचे विकार असणार्‍यांना चिंच, कोकम हे पदार्थ त्रास देऊ शकतात. परंतु, डाळिंब व आवळा यांचा त्रास निश्चितच होत नाही. जेवणात आंबटपणासाठी डािंळबाचे सुके दाणे िंकवा आवळकाठी वापरावी म्हणजे त्रास न होता भोजन रुचकर बनते.
डाळिंबाच्या फळाचा रस :
* डाळिंबाच्या फळाचा रस पित्तशामक आहे.
* तसेच तो क्षुधावर्धक असल्याने भूक वाढते आणि पचन व्यवस्थित होते.
* तो बलदायक व सप्तधातुवर्धक आहे.
* डाळिंबाचा रस हृदयरोग असणार्‍यांना फारच उपयुक्त आहे.
* हा रस 4 तोळे व खडीसाखर घेतल्याने पोटाची जळजळ, आंबट ढेकर, लघवीची आग होणे कमी होते.
* अनियमित जेवण, तीव्र मद्य पिणे, चमचमीत मांसाहार करणे यामुळे जठर, आतडी सुजतात, दुखतात आणि ढेकर येणे, घसा जळजळणे, अस्वस्थता जाणवणे या तक्रारी उद्भवतात. यावेळी डािंळबाचा रस घ्यावा. डाळिंबाच्या रसामुळे पोटाची सूजही कमी होते.
* तापाचे प्रमाण अधिक झाले की तहान लागते वा लघवी कमी आणि जळजळीत होते. अशा वेळी डाळिंबाचा रस थोड्या थोड्या वेळाने घ्यावा म्हणजे फायदा होतो.
* उष्णतेच्या विकारावर डािंळब खाल्ल्याने आराम होतो.
* दिवस गेलेल्या स्त्रीला उलट्या होत असल्यास रसाचा एक महिन्यापासून पाक साखरेत करून ठेवावा. तो घेत राहिल्याने फायदा होतो.
* डाळिंबाचा रस मधात घेतल्याने अनेक विकार कमी होतात.
* लहान मुलाला गोवर झाल्यास रस द्यावा किंवा डाळिंबाचे दाणे द्यावे.
* डोळे आले असल्यास किंवा जळजळ होत असल्यास दोन थेंब रस डोळ्यांत टाकल्याने फायदा होतो.
* रक्तपित्तत या रोगावरही डािंळब रस गुणकारी आहे.
* रक्तदाब, ताप, खोकला, मूळव्याध अशा अनेक रोगांवर या फळाच्या रसाचा उपयोग होतो. आता तर बाजारातही रस विकत मिळत असतो. तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आहारात वापरल्यास बर्‍याच व्याधींपासून सुटका होऊ शकते.
 
 कृतिका चित्तरंजन गांगडे
कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, जि. गोंदिया