उत्तरप्रदेश, सपा-बसपा-कॉंग्रेस आणि भाजपा
   दिनांक :03-Apr-2019
 
 
वर्षभरापूर्वी उत्तरप्रदेशात लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी राजीनामे दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. गोरखपूर आणि फुलपूर अशा दोन मतदारसंघांत झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करीत विजय मिळविला. मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने अचानक दिलेल्या पािंठब्याने समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना बळ मिळाले अन्‌ ते विजयी झाले. या विजयामुळे राज्यात नवी राजकीय समीकरणं आकार घेतात की काय, असे वाटायला लागले होते आणि कालांतराने ते खरेही ठरले. आज कॉंग्रेसला बाजूला सारत हे दोन्ही पक्ष एकत्र लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यात जागावाटपही पूर्ण झाले आहे. एकत्र मुकाबला केला तर भाजपाचा पराभव करू शकतो, याची खात्री पटलेले परस्परांचे राजकीय वैरी समाजवादी पार्टी आणि बसपा एकत्र आले आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत बसपाचा उमेदवार पराभूत झाल्यानंतरही मायावतींनी समाजवादी पार्टीवर नाराजी व्यक्त न करणे आणि युती अभेद्य राहील अशी घोषणा करणे, यावरून उत्तरप्रदेशात 2019 मध्ये काय होणार, हे लक्षात आलेच होते.
 

 
 
 
आजतरी उत्तरप्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव यांच्यात कुठलाही कडवटपणा असल्याचे दिसत नाही. या दोन नेत्यांमधील मैत्री कशा पद्धतीने पुढे सरकते, कायम राहते, यावर सगळे काही अवलंबून आहे, असे बोलले जात असतानाच त्यांच्यातली युती अभेद्य झाल्याचे चित्र आहे. भाजपाला पराभूत करणे, या केवळ एका मुद्यावर हे दोन नेते आणि त्यांचे पक्ष आज एकत्र आलेले दिसतात. भाजपाने 2014 साली सपा-बसपासह सगळ्याच राजकीय पक्षांना धोबीपछाड दिली होती. सगळ्यांचा सुपडा साफ केला होता. ऐंशीपैकी 73 जागा जिंकत एक राष्ट्रीय विक्रमही केला होता आणि त्याच बळावर केंद्रातील सत्तेतून कॉंग्रेसला बाहेर केले होते. एवढेच नव्हे, तर त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने सगळे विक्रम मोडीत काढले. 325 जागा जिंकत भाजपाने प्रचंड बहुमतातले सरकार योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तरप्रदेशात स्थापन केले. तेव्हापासून सपा आणि बसपा हे दोन पक्ष यशाचा मार्ग शोधत होते, तो त्यांना वर्षभरापूर्वी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सापडला आणि आता ते एकत्र लढून भाजपाला हरविण्याच्या इराद्याने पुढे सरकले आहेत.
 
पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशानंतर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी आता मायावतींची प्रशंसा सुरू केली होती, ती आजही सुरूच आहे. गेल्या वर्षी समाजवादी पार्टीकडून डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जे पोस्टर्स आणि बॅनर्स तयार करण्यात आले होते, त्यावर डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या बाजूला मायावतींना स्थान देण्यात आले होते. 1995 साली उत्तरप्रदेशात जे गेस्ट हाऊस कांड झाले होते, त्यात अखिलेश यादव यांचा हात नाही, असे सांगत मायावतींनीही क्लीन चिट दिली. अखिलेश यादव आणि मायावती हे दोन्ही नेते अतिशय सावध पावले टाकत पुढे सरकले आहेत. वर्षभरापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर मायावती समाजवादी पार्टीशी संबंधविच्छेद करतील आणि अखिलेश यांच्यावर जोरदार प्रहार करतील, विश्वासघाताचा आरोप करतील, असा जो विरोधकांचा विचार होता, तोच मायावतींनी पराभूत केला. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर अखिलेश यादव मायावतींच्या घरी जाऊन आले, आता तर प्रत्यक्ष लोकसभेची निवडणूक ते एकत्र लढत आहेत, याकडे दुर्लक्ष करता यायचे नाही.
 
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपा आणि बसपा या दोघांना जेवढी मतं मिळाली होती, ती एकत्र झाल्यानेच पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला, हे अमान्य करता येत नाही. ही मतं आता पुढल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकत्र झालीत तर भाजपासाठी ही धोक्याची घंटा ठरणार. काहीही करून भाजपाला पराभूत करायचे, हा विरोधी पक्षांचा कॉमन अजेंडा आहे. सपा-बसपाने तर जागावाटपही यशस्वी केल्याने परिस्थिती कोणते वळण घेईल, काही सांगता यायचे नाही. ऐंशीपैकी 38 जागा सपाने आणि 38 जागा बसपाने लढायच्या, कॉंग्रेसलाही आघाडीत सहभागी करून घेत 2 जागा द्यायच्या, असे समीकरण आकारास आले. पण, कॉंग्रेसने सपा-बसपासोबत युती करण्यास नकार दिला. आता कॉंग्रेस प्रियांकाच्या नेतृत्वात उत्तरप्रदेशात स्वतंत्रपणे लढत आहे. याचा फायदा भाजपाला होईल, असा अंदाज आहे. याचा अर्थ भाजपाने मोडतोडीसाठी प्रयत्न करावेत, असा नाही. पण, भाजपाने गाफील राहून चालणार नाही.
 
अपेक्षेप्रमाणे पोटनिवडणुकीचे निकाल भाजपाने गांभीर्याने घेतले, हे बरे झाले. यंदाच्या निवडणुकीत शतप्रतिशत यश मिळविण्याचा निर्धार भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. 2014 च्या निवडणुकीत 42 टक्के मते मिळवत भाजपाने 73 जागा जिंकल्या होत्या. आता भाजपाने पन्नास टक्के मते मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले नसते तरच नवल! जर भाजपाने पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळविलीत तर 2014 पेक्षाही उत्तुंग यश भाजपाला मिळू शकते, भाजपाकडून केल्या जाणार्‍या दाव्यावरही विश्वास ठेवता येईल. परंतु, ज्या कारणांमुळे गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा पराभव झाला, ती कारणे कायम राहिलीत तर असलेल्या जागाही कायम राखण्याचे आव्हान भाजपापुढे असेल, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
मायावती आणि अखिलेश यादव यांची परंपरागत मते आहेत. शिवाय, मुस्लिम मतदार हा सगळ्यात मोठा घटक आहे. त्यामुळे ही मतं कुणाकडे जातात यावरही बरेच काही अवलंबून आहे. मुस्लिम मतदार जर एकत्र झाले तर हिंदू मतदारही एकत्र होतील आणि सरतेशेवटी त्याचा फायदा हा भाजपालाच मिळेल, यात शंका नाही. बिहारमध्ये मुस्लिमांनी जी भूमिका घेतली तीच उत्तरप्रदेशातही घेतली तर चित्र वेगळे राहू शकते. ज्या उत्तरप्रदेशने कॉंग्रेसला पंतप्रधानपदाचे सर्वाधिक उमेदवार दिलेत, त्या उत्तरप्रदेशात आज कॉंग्रेस अप्रासंगिक झाली आहे. अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ वगळले तर अन्यत्र कुठे कॉंग्रेस जिंकेल अशी स्थिती नाही. भाजपाला आपला जनाधार टिकविण्यासाठी मध्यमवर्गीय लोक आणि शेतकरी यांना आपल्याकडे वळविण्यासाठी ठोस उपाय करावे लागणार आहेत. मोदी आणि योगी यांच्यावरील लोकांचा विश्वास ही भाजपाची जमेची बाजू असली, तरी तो विश्वास टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपाला पेलावे लागत आहे. मध्यमवर्गात जी उदासीनता वाढत चालली आहे, ती कमी करण्याचे आव्हानही भाजपापुढे आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी निवडणुका जिंकण्यासाठी  ज्या काही उपाययोजना केल्या असतील त्यात निश्चितपणे सर्व मुद्यांचा विचार केलाच असणार. सपा आणि बसपाची युती ही संधिसाधू आहे आणि कॉंग्रेस तर स्पर्धेतच दिसत नाही. त्यामुळे जनता योग्य निर्णय घेईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा भाजपाला कौल देईल, अशी आशा करू या...!