यवतमाळमध्ये भीषण अपघातात तीन ठार
   दिनांक :30-Apr-2019
हिंगोली/तभा वृत्तसेवा,  
चंद्रपुरातील महाकाली देवीचे दर्शन घेवून गावी परतत असताना यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव जवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात ट्रकने टाटा मॅक्स गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. यातील जखमी नववधूस उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना रस्त्यातच तिचा दुर्दवी मृत्यू झाला.  

लक्ष्मीबाई भारत उपरे (६०), सानिका किसन भोपाळे (१३) ह्या दोघी जागीच ठार झाल्या. तर गंभीर जखमीमध्ये नववधू साक्षी देवीदास उपरे (१९) हिला उपचारासाठी नागपूरला नेताना मृत्यू झाला. तर राजनंदिनी सुनिल पवार (४), साधना कोंडबा गोंधरे (३५), चंपाबाई बाबा पेंढलेवार (७०) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आखाडा बाळापूर येथील साक्षी देवीदास उपरे हिचा २४ एप्रिल रोजी गावातील देवीदास उपरे यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यानंतर ते नवदाम्पत्य आपल्या कुटुंबियांसह चंद्रपूर येथील महाकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवीचे दर्शन घेवून टाटा मॅक्स क्रमांक एमएच-३४-के-२४३८ मधून हिंगोलीकडे येत होते. याचवेळी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव नजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या टाटा मॅक्स गाडीस जोराची धडक दिली. या धडकेमुळे टाटा मॅक्सने तीन पलटी खाल्या. यात अपघातात २ जण जागीच ठार तर सहा जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर शहरावर शोककळा पसरली.