बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटच हवी!
   दिनांक :30-Apr-2019
 
सतराव्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत, यंदा सगळ्यात जास्त हिंसाचार हा ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये झाला आहे. ममता बॅनर्जी यांची गेल्या दोन-तीन वर्षांतील वागणूक ही काहीशी हुकूमशाहीकडे झुकणारी असल्याचे स्पष्टपणे जाणवले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या कायकर्त्यांवर अनेकदा हिंसक हल्ले केले आहेत आणि त्यात भाजपाचे अनेक कार्यकर्ते गंभीर जखमीही झाले आहेत. पराभव समोर दिसायला लागला की ममता बॅनर्जी चवताळून उठतात, काहीबाही बडबड करतात, भाजपावर बिनबुडाचे आरोप करतात. हे आता नित्याचेच झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते अक्षरश: गुंडागर्दी करीत आहेत. काल चौथ्या टप्प्यातील मतदान झाले. बंगालमधील 42 पैकी आठ मतदारसंघांत मतदान होते. आसनसोल येथून भाजपाचे बाबूल सुप्रियो हे उमेदवार आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांना बूथवरसुद्धा जाऊ दिले नाही, यावरून त्यांच्या गुंडागर्दीची कल्पना यावी. कम्युनिस्ट पक्षाचे जे कॅडर होते, ते तृणमूलकडे वळल्याने तृणमूल हा पक्ष आणखी हिंसक झाल्याचे जे बोलले जात आहे, त्याचा प्रत्यय सोमवारी मतदानाच्या वेळी आलाच!
 
 
 
सोमवारी मतदान सुरू असताना सकाळपासूनच तृणमूलच्या गुंडांनी हिंसाचार सुरू केला होता. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यापासून सुरू झालेला हिंसाचार माध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत जाऊन पोहोचला होता. काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना तृणमूलच्या गुंडांनी अक्षरश: चोप दिला. माध्यमांकडून सत्य दडविले जावे, अशी अपेक्षा करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने बंगालमध्ये उभा धिंगाणा घातला आहे. इतरांच्या नावाने खडे फोडणार्‍या तृणमूल कॉंग्रेसला याची लाज कशी वाटत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अक्षरश: घाणेरड्या भाषेत टीका करणार्‍या ममता बॅनर्जी या किती आक्रस्ताळ्या स्वभावाच्या आणि बेलगाम झाल्या आहेत, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आचारसंहितेचे सर्वाधिक उल्लंघन केले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत आणि सत्तेचा संपूर्ण दुरुपयोग त्यांनी केला आहे. असे असतानाही त्या मोदींना हुकूमशहा म्हणतात, हे केवळ हास्यास्पद आहे. ममता बॅनर्जी यांनी कुणावरही टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याने त्यांनी आता काहीही न बोललेलेच बरे!
 
हिंसाचार करताना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अतिशय खालचा स्तर गाठला आहे. भाजपाचे उमेदवार बाबूल सुप्रियो यांची कारसुद्धा मतदान केंद्रापर्यंत जाऊ न देण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली होती. एवढेच काय, मतदान केंद्रावर भाजपाच्या कार्यकर्त्यांना जाऊ दिले जात नसल्याची बातमी कळल्यावरून, सुप्रियो यांच्याशी बोलायला गेलेल्या माध्यमप्रतिनिधींना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली. सत्तेचे पाठबळ लाभल्यानेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी उभा िंधगाणा घातल्याचे स्पष्ट दिसते आहे. ममता बॅनर्जी सत्तेत असल्या तरी दादागिरी करतात आणि विरोधात असल्या तरी दादागिरी करतात, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी खरेतर त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने निवडणूक आयोगाला मदत करायला हवी होती. राज्यात कायदा-सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारची आहे. असे असतानाही त्याउलट कृती त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते हिंसाचार घडवून आणत निवडणूकप्रक्रिया उधळून लावत असतील, राज्यात अराजकाची परिस्थिती निर्माण करीत असतील, तर तिथे राष्ट्रपती राजवटच लावली पाहिजे! लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षच जर हिंसाचार घडवून आणत असेल, निवडणूकप्रक्रिया उधळून लावणार असेल, तर त्या राज्यात लोकशाही अस्तित्वात आहे, यावर कसा विश्वास ठेवता येईल?
 
सतराव्या लोकसभेसाठी अर्ध्यापेक्षा जास्त जागांवर मतदान आटोपले आहे. सातपैकी चार टप्पे पार पडले आहेत. अशा परिस्थितीत बंगालमध्ये हिंसाचार होत आहे आणि दुसरीकडे अनेक नेते इलेक्ट्रॅनिक मतदान यंत्रावर अविश्वास व्यक्त करत आहेत. एकप्रकारे निवडणूकप्रक्रिया बदनाम करण्याचा डाव त्यांनी रचला आहे, असे म्हणण्यास वाव आहे. ममता बॅनर्जी यांना पराभव समोर दिसायला लागला की, त्या अक्षरश: किंचाळत सुटतात. त्यांच्या किंचाळण्याला काही अर्थ नसतो. बंगालसारखे राज्य त्यांनी मातीत घातले आहे. बंगालच्या प्रगतीसाठी झटण्याऐवजी त्यांनी त्या राज्याची अधोगती केली आहे. बंगाल हा प्रदेश अतिशय मागास ठेवण्यात आधी कम्युनिस्टांची राजवट कारणीभूत होती आणि त्याला अतिमागास ठेवण्याचे पाप आता ममता बॅनर्जी यांनी केले आहे. बंगाली माणसाला विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी ममता बॅनर्जी यांनी त्याला हिंसाचाराच्या मार्गाने नेले आहे. एवढेच काय, ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांची तळी उचलण्याचे पापही केले आहे. आज बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि सातत्याने वाढतेच आहे. त्यामुळे देशाच्या एकतेला आणि अखंडतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. वेळीच पावलं उचलली गेली नाहीत, तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही!
 
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने बंगालमध्ये अजय नायक यांना निरीक्षक म्हणून पाठविले होते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी बिहारमध्ये जशी परिस्थिती होती, तशी आज बंगालमध्ये दिसत असल्याचे मत नायक यांनी नोंदविताच, ममता बॅनर्जी यांनी थयथयाट केला आणि नायक यांना बंगालमधून हटवा, अशी मागणी करून टाकली. काय चूक बोलले होते हो अजय नायक? दहा-पंधरा वर्षांपूर्वी बिहारमध्ये मतदारांना धमकावले जात होते, घाबरवले जात होते. बोगस मतदान केले जात होते. तीच बाब यावेळी नायक यांना बंगालमध्ये दिसून आली असेल अन्‌ त्यांनी आयोगाचा निरीक्षक या नात्याने आपले मत नोंदविले असेल तर त्यात चूक काय? चूक एवढीच की, त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची, त्यांच्या राजवटीची पोलखोल केली. देशात आज पश्चिम बंगाल हे असे एकमेव राज्य आहे, जिथे मतदारच घाबरलेले आहेत असे नव्हे, तर निवडणूककर्तव्यावर असलेले कर्मचारीही भयभीत आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी एवढी प्रचंड दहशत निर्माण केली आहे की, निवडणुकीच्या कर्तव्यावरून आपण सुखरूप घरी परत जाऊ की नाही, याचीही खात्री त्या कर्मचार्‍यांना राहिलेली नाही. या निवडणूक कर्मचार्‍यांचा राज्याच्या पोलिसांवरही विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत केंद्रीय सुरक्षा दलाकडून सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत कामावर जाणार नाही, अशी भूमिका निवडणूक कर्मचारी घेतात, त्या बंगालसाठी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. अशी दहशत ज्या राज्यात आहे, त्या राज्यात लोकशाही उरलेली नाही आणि इतरांकडे बोट दाखवत सातत्याने टीकेचे प्रहार करणार्‍या ममता बॅनर्जी यांना आता लोकशाहीविषयी बोलण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही!