इंडोनेशियात पुराचा हाहाकार; 29 जणांचा मृत्यू
   दिनांक :30-Apr-2019
बेंग्कुलू,
इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडोनेशियाच्या आपत्कालीन यंत्रणेने सोमवारी 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असून आणखी 13 जण बेपत्ता असल्याचं स्पष्ट केलं आहे. लामपुंग प्रांतात शनिवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन त्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर जकार्ताच्या आजूबाजूच्या परिसरात आलेल्या पुरामुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता.
 
 
जवळपास दोन हजारांहून अधिक जणांना घरातून बाहेर पडावे लागले आहे. सुमात्राच्या बेंग्कुलू प्रांतात पाणी साचल्याने 12 हजार नागरिकांना बाहेर काढावे लागले. तसेच अनेक इमारती, पूल आणि रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले. बेकायदेशीर कोळसा खाणींमुळे भूस्खलन मोठय़ा प्रमाणावर झाल्याचा आरोपही केला जात आहे. तर मानवनिर्मित संकटांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पूर आल्याचा आरोपही काही जणांनी केला आहे.
इंडोनेशियाच्या पापुआ भागात याआधी काही दिवसांपूर्वी अचानक आलेल्या महापुरामुळे 79 जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जयपुरा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. पूर आणि भूस्खलनामुळे 116 जण जखमी झाले असून त्यातील 41 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली होती. पूराचा अनेक जिल्ह्यांना फटका असल्यामुळे आपत्तीमधील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. कारण अनेक जण बेपत्ता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. या परिसरातील घरे, रस्ते, पूल आणि इतर ठिकाणांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले होते.