नॉर्वेच्या समुद्रातील बेलुगा व्हेल रशियाचा हेर?
   दिनांक :30-Apr-2019
ओस्लो,
एका शुभ्र व्हेल माशाच्या गळ्यात कॅमेरा पाहून नॉर्वे देशातील मच्छिमार आश्चर्यचकित झाले. हा बेलुगा व्हेल मासा होता. या माशाच्या गळ्यात पट्ट्यासारखे काहीतरी गुंडाळल्याचे मासेमारांना दिसले. हा व्हेल मासेमारांच्या जहाजाच्या दिशेनेच येत असल्याचे मच्छिमारांना आढळले. हा प्रकार सामान्य नसून तो गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणारा असावा अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
 
बेलुगा व्हेलबद्दल थोडक्यात
बेलुगा व्हेलमाशाला बोली भाषेत पांढरा व्हेल म्हणतात. हा व्हेल प्रजातीतील सर्वात छोटा व्हेल आहे. बेलुगा व्हेलचा आकार २० फुटांपर्यंत असतो. हा व्हेल सर्वसाधारणपणे आर्कटिन महासागरात आढळतो.
बेलुगा व्हेल हेर
बेलुगा व्हेलच्या गळ्याला बांधण्यात आलेल्या पट्ट्यावर इक्युपेमंट ऑफ सेंट पीट्सबर्ग असे लिहिलेले आहे. या वरून हा व्हेल रशिया या देशाचा हेर असावा असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत. रशियाकडे अनेक घरगुती व्हेल आहेत हे सर्वांनाच माहित असल्याचे आर्कटिक विद्यापीठात मरीन बायॉलॉजीचे प्रोफेसर आडन रिकॉर्ड्सन यांनी म्हटले आहे. या व्हेलपैकीच काही समुद्रात सोडले असण्याची शक्यता असल्याचे रिकॉर्ड्सन म्हणाले. व्हेलच्या गळ्यातील कॅमेरा हा रशियातील संशोधकांचा असण्यापेक्षा तो रशियाच्या नौसेनेचा असण्याची शक्यता असल्याचे वृत्तही प्रसारित झाले आहे.