जपान नरेश अखिहितो यांचा पदत्याग
   दिनांक :30-Apr-2019
200 वर्षांत पहिलीच घटना
टोकियो: जपानचे नरेश अखिहितो यांनी आज मंगळवारी औपचारिकपणे आपल्या पदाचा त्याग केला आहे. जगातील सर्वांत मोठी राजेशाही असलेल्या जपानमध्ये सुमारे 200 वर्षांनंतर झालेला हा पहिलाच पदत्याग ठरला आहे. या घडामोडीसोबतच अखिहितो यांच्या पर्वाचा अस्त झाला असून, त्यांचे पुत्र नरुहितो यांच्याकडे जपानचे नरेशपद सोपविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

टोकियोमधील राजघराण्याच्या भव्य सभागृहात आयोजित विधिवत्‌ सोहोळ्यात 85 वर्षीय अखिहितो यांनी पदत्याग केला. या सोहोळ्यात प्राचीन तलवार आणि अन्य अतिशय दुर्मिळ दागिन्यांसह राजघराण्यातील अन्य किमती वस्तूंची रास मांडण्यात आली होती.
आपल्या निरोप समारंभात अखिहितो यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करतानाच, त्यांचे आभारही मानले. जपान आणि जगभरातील नागरिकांच्या कल्याणासाठी मी सदैव प्रार्थना करेल, असे ते म्हणाले. आज सकाळपासूनच टोकियो आणि आसपासच्या भागात पावसाची संततधार सुरू असतानाही अखिहितो यांचे हजारो हितिंचतक आणि मोठ्या संख्येत नागरिक राजमहालाच्या परिसरात उपस्थित झाले होते. पंतप्रधान शिंझो आबे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक सर्वच सदस्यही या सोहोळ्यात सहभागी झाले होते.
नरुहितो मध्यरात्री स्वीकारणार सूत्रे
अखिहितो यांचे पुत्र नरुहितो मंगळवारच्या मध्यरात्रीच्या ठोक्याला नरेशपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने, तोपर्यंत हे पद अखिहितो यांच्याकडेच राहणार आहे, अशी माहिती राजघराण्यातील सदस्यांनी दिली.