किन्ही घोडमोड येथे धम्म ध्वजाची विटंबना
   दिनांक :30-Apr-2019
समाजबांधवांची पोलिस स्टेशनवर धडक 

 
शिरपूर जैन, 
येथील पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या किन्ही घोडमोड येथे समाज मंदिरासमोर असलेल्या धम्म ध्वजाची 29 एप्रिल रोजी रात्री कुण्यातरी अज्ञात व्यक्तीने विटंबना केली. यामुळे संतापलेल्या समाजबांधवांनी आज सकाळी शिरपूर पोलिस स्टेशनवर धडक देवून कारवाईची मागणी केली. त्याची तत्काळ दखल घेवून पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
किन्ही घोडमोड येथे अज्ञात व्यक्तीने समाज मंदिरासमोर असलेल्या धम्म ध्वजाची विटंबना करून ध्वज लावून असलेला पोलही वाकविला. त्यामुळे संतप्त झालेले समाजबांधव पोलिस स्टेशनवर धडकले. संबंधित दोषी व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी संजय शिंदे, विलास गवळी, प्रदीप आडागळे, सज्जन कांबळे, रणजीत भालेराव, सुभाष चक्रनारायण, पंजाब चक्रनारायण, राहुल चक्रनारायण, अक्षय चक्रनारायण, आशिष चक्रनारायण, गजानन चक्रनारायण, उत्तम वानखेडे, विनोद कांबळे, राहुल कांबळे, सुनिता चक्रनारायण, छाया चक्रनारायण, नर्मदा कांबळे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.