आमीष दाखवून लुटणारा बाप आणि मुलगी जेरबंद!
   दिनांक :30-Apr-2019
वाशीम, 
कमी पैशात सोने देण्याचे आमीष दाखवून लुटणार्‍या आठ जणांच्या टोळीतील मूख्य सूत्रधार असलेल्या बापास व त्याच्या मुलीस वाशीमच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पुढील कारवाईसाठी दोघांनाही यवतमाळ एलसीबीच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात दोन पोलिस कर्मचार्‍यांसह अन्य एका आरोपीस यापूर्वीच अटक करण्यात आली असून, आठपैकी तीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी मंगळवारी दिली.
  
 
याबाबत अधिक माहिती अशी, 17 मार्च 2019 रोजी फिर्यादी रणजीत पांडूरंग गायकवाड (शिरूर जि.पुणे) यांना तीन किलो सोने 14 लाख रुपयात देण्याची बतावणी करून तथा प्रत्यक्षात त्यांना 12.50 लाख रुपयांनी गंडा घातल्याप्रकरणी पोफाळी जि. यवतमाळ पोलिस ठाण्यात आरोपींविरूद्ध भादंविचे कलम 420, 471, 34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारंजा पोलिस दलात कार्यरत कैलास मंगूसिंग राठोड, मंगरूळनाथ पोलिस ठाण्यात कार्यरत मुकेश श्रीराम गौरखेडे या दोन पोलिस कर्मचार्‍यांसह शिवा कानडे रा.म्हसणी अशा तिघांना अटक केली. विशेष म्हणजे वाशीमच्या पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित देखील केले.
 
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुखदेव पंडित चव्हाण रा. कारंजा हा त्याच्या नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाल्यावरून मंगरूळनाथ पोलिस दलातील अरविंद सोनवणे यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. सुखदेव चव्हाणची कसून चौकशी केली असता, त्याने रणजित गायकवाड यांना 12.50 लाखांनी लुटल्याची कबूली देण्यासोबतच यातील अन्य आरोपींची नावेही उजागर केली. विशेष गंभीर बाब म्हणजे या गुन्ह्यात त्याची मुलगी सपना सुखदेव चव्हाण हिचाही समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार, बापास व मुलीस ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी यवतमाळ ‘एलसीबी’कडे सोपविण्यात आल्याची माहिती शिवा ठाकरे यांनी दिली.
 
 
पातूर आणि शेगावातील गुन्ह्यांचीही दिली कबूली
सुखदेव चव्हाण व त्याच्या टोळीने रणजीत राठोड यांना 12.50 लाखांनी लुटण्यासोबतच पातूर जि. अकोला येथे 7 नोव्हेंबर 2018 रोजी पवन पांडुरंग कापसे यांची फसवणूक करून 3 लाख रुपये लुबाडले. तसेच शेगाव जि. बुलडाणा 18 मे 2018 रोजी लईक हसन यांची 12 लाख रुपयांनी फसवणूक केली. या दोन्ही गुन्ह्यांची कबूली सुखदेव चव्हाण याने तपासादरम्यान दिली.