क्रांतिकारी उधम सिंहच्या भूमिकेत विकी कौशल
   दिनांक :30-Apr-2019
विकी आता क्रांतीकारकाच्या भूमिकेत दिसणार आहे. शूजित सरकारच्या आगामी चित्रपटात तो क्रांतिकारी उधम सिंह यांची भूमिका साकारणार आहे. आपला लाडका अभिनेता उधम सिंह यांच्या भूमिकेत नेमका कसा दिसेल याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. सध्या विकीचा उधम सिंहच्या भूमिकेतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
 
 
'सरदार उधम सिंह' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रीकरणादरम्यान विकीचा हा फोटो काढण्यात आला आणि तो व्हायरल झालाय. या फोटोत विकी कोट आणि हॅटमध्ये दिसतो आहे शिवाय, त्याने दाढी - मिशी कापून केसही अगदी बारिक ठेवले आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत शूजित सरकार विकीला त्याच्या दृश्याबद्दल समजावताना दिसत आहे. विकीच्या फॅन्सनी त्याच्या या लूकचे प्रचंड कौतुक केले आहे. त्याचा हा 'अँग्री यंग मॅन' लूक चाहत्यांना फारच भावतोय.
'सरदार उधम सिंह' चित्रपट भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकार उधम सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे. उधम सिंह गदर पक्षाचे सदस्य होते आणि ब्रिटीशांविरोधात लढण्यासाठी त्यांनी भारतीयांना प्रेरित केले होते. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी त्यांनी पंजाबचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर Michael O' Dwyer या अधिकाऱ्याची हत्या केली होती.