5-जी सेवा देणारा दक्षिण कोरिया जगातील पहिला देश
   दिनांक :04-Apr-2019
सेऊल,
तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे असलेल्या अमेरिका, चीन, रशियाने नाही, तर दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5-जी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री 11 वाजता देशवासीयांसाठी 5- जी लॉंच करण्यात आले. दक्षिण कोरियाने यापूर्वी 5 एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरू करण्यासाठी तारीख निश्चित केली होती. मात्र, अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी दोन दिवस आधीच ही सेवा सुरू करण्यात आली. 4-जीच्या तुलनेत 5-जी 20 पटींनी वेगवान असणार आहे.
 

 
 
दक्षिण कोरियाच्या टॉपच्या टेलिकॉम कंपन्या एसके, केटी आणि एलजी यूप्लस यांनी 5-जी सेवा देशभरात देण्यास सुरुवात केली. कोरियाच्या सहा महत्त्वाच्या सेलिब्रिटींनी त्यांच्या फोनवर ही सेवा सुरू केली. यामध्ये पॉप बँड्‌स ईएक्सओच्या दोन सदस्यांसह ऑलिम्पिक आईस स्केिंटगपटू किम यू ना सहभागी होते. सर्वसामान्यांना शुक्रवारपासून ही सेवा वापरता येणार आहे.
सॅमसंगच्या नव्या गॅलेक्सी एस-10 5-जी मॉडेलवर पहिल्यांदाच 5-जीची सेवा सुरू करण्यात आली. सॅमसंगहीदेखील कोरियाचीच कंपनी आहे. सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये हा फोन लॉंच केला होता. या फोनची िंकमत दोन हजार डॉलर्स आहे.
नव्या 5-जी सेवेमुळे देशात ड्रायव्हरलेस कारसारख्या क्षेत्रांना गती मिळण्याची अपेक्षा कोरियाला आहे. यामुळे आर्थिक विकासालाही गती मिळेल. दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी होत आहे. 2018 मध्ये आर्थिक स्तर सहा वर्षांपेक्षा खाली आला होता.
5-जी सेवा सर्वप्रथम सुरू करण्यासाठी चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये स्पर्धा सुरू होती. अमेरिकेची टेलिकॉम कंपनी व्हेरिझॉन दोन शहरांमध्ये 11 एप्रिलपासून 5-जी सेवा सुरू करणार आहे. चीनच्या काही शहरांमध्ये अद्याप चाचणी सुरू आहे.
दक्षिण कोरियाने 5-जी सेवेच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. एसके टेलिकॉमला 2019 च्या शेवटी 10 लाखांहून अधिक ग्राहक जोडले जाण्याची अपेक्षा आहे. त्यांच्याकडे सध्या 4-जीसाठी 2.7 कोटी ग्राहक आहेत, तर केटी कॉर्प 4-जी पेक्षा स्वस्त प्लान देणार आहे.