आसिफ झरदारींनी दडवली 10 लाख डॉलर्सची संपत्ती
   दिनांक :04-Apr-2019
-पाकिस्तानी न्यायालयाची नोटिस
इस्लामाबाद,
पाकिस्तानात मागील वर्षी झालेल्या निवडणुकीदरम्यान माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी न्यू यॉर्क येथील सदनिका आणि आलिशान बुलेटप्रुफ वाहनाची माहिती दडवल्याचा आरोप करीत, त्यांना अपात्र घोषित करण्याच्या मागणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरून उच्च न्यायालयाने त्यांना नोटिस बजावली आहे.
 

 
 
सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते खुर्रम शेर झमान आणि उस्मान दार यांनी ही याचिका दाखल केली आहे.
अशा प्रकरणांसाठी संसद हे योग्य मंच आहे, असे मुख्य न्यायमूर्ती अतहर मिनल्लाह यांनी स्पष्ट करीत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष झरदारी यांना नोटिस बजावली.
न्यू यॉर्कमध्ये झरदारी यांच्या मालकीची सदनिका आहे. 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान त्यांनी याचा उल्लेख केला नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या संपत्तीचे मूल्य 10 लाख डॉलर्स असल्याचेही याचिकाकर्त्यांनी सांगितले. पाकिस्तानातील नियमाप्रमाणे निवडणुकीतील उमेदवाराला त्याची संपत्ती जाहीर करावी लागते, अन्यथा त्याला अपात्र घोषित केले जाते.