वर्षप्रतिपदा - रमणीयतेचा उत्सव
   दिनांक :04-Apr-2019
गु
ढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ! नवीन वर्षाची सुरुवात. राम अयोध्येत आले तो दिवस! चैत्री श्रीराम नवरात्र! वासंतिक देवी नवरात्र आरंभ, विक्रम संवत आरंभ. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस! वसंत ऋतूचा आरंभ! या काळात निसर्गाचे नवे रंग-रूप बघायला मिळतात. आंब्याचा मोहराचा सुगंध याच काळात पसरतो. व सर्व उत्सवांचे प्रवेशद्वार म्हणजे वर्षप्रतिपदा!
या दिवशी शुचिर्भूत होऊन दाराला तोरण बांधावे. देवपूजा करून गुढी उभारावी. खरं तर सोबत ध्वजही उभारावा. सातत्याने होणार्‍या परकीय आक्रमणामुळे ध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून जरीचे वस्त्र उभारण्यास सुरुवात झाली.
ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून गुढीचे पूजन करावे. सर्व उत्सवाच्या प्रवेशद्वारावरील उत्सवाची मांडणी ही जाणीवपूर्वक व विचारानेच केली आहे. गुढीवरील कलश यशाचे प्रतीक तर कडुिंलब आरोग्यासाठी , पुष्पहार मांगल्याची खूण तर साखर गाठी माधुर्य भाव प्रदर्शित करण्यासाठी, जरीचे वस्त्र वैभवसाठी तर काठी सामर्थ्य उन्नतीसाठी! नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्प! त्या संकल्पपूर्तीची गुढी उभारूया. वसंत ऋतू म्हणजे झाडाला नवी पालवी फुटण्याचा काळ. यातून निसर्गाशी, ऋतूशी जवळीक साधण्याचा प्रयत्न अपेक्षित असावा.
 
 
 
या काळात सकाळ व संध्याकाळ अतिशय प्रसन्न असते. संध्याकाळी तर कातरवेळ असून सुद्धा हुरहूर लागत नाही. मंद व सुखद झुळूक वाहत असतात. स्वच्छ चांदण शीतलता प्रदान करत असतं. सगळीकडे धार्मिक वातावरण असताना मन आनंदून जातं. भुकेसाठी विविध फळ उपलब्ध असतात. प्यायला मठातील वाळामिश्रित थंड पाणी असतं. झोपेसाठी पतली पांघरूण असतात. रात्रीच्या वेळी बागेतील मोगर्‍याचा सुगंध अनुभवता येतो. हे सर्व मानवी मनाला चैतन्य, उत्साह व रमणीयता प्रदान करतात.
भारतीय सणांमधील शास्त्रीय, सामाजिक व धार्मिक कारणे समजून घेतले तर जाणीवपूर्वक हा वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित होईल. येणारे नवे वर्ष सुख, शांती, समृद्धी व निरामय आरोग्य प्रदान करो हीच मंगलकामना.
नूतन वर्षाभिनंदन!
सर्वेश फडणवीस