कॉंग्रेसच्या मंचावर महिलांच्या अब्रूची धिंड!
   दिनांक :04-Apr-2019
राजकारणाचा वारसा घराणेशाहीतून पदरी पडलेल्या नव्या पिढीतील लोकांना बहुधा आपल्या वाडवडिलांनी, त्यांच्या आयुष्यात काय संघर्ष केला, किती उंबरठे झिजवले, किती उन्हाळे सहन केले, याची जाणीव नसते. म्हणूनच, आई-वडिलांचे नाव मागे लागल्यामुळे मोठेपण वाट्याला आले की, त्याचे खोबरे करण्यासाठीच जणू धडपड चालली असते त्यांची. राहुल गांधी काय अन्‌ जयदीप कवाडे काय, सारख्याच श्रेणीत मोडणारी उदाहरणे आहेत सारी. वारसाहक्काने एका राजकीय पक्षाची मोठी जबाबदारी पदरात पडूनही त्या संधीचे सोने करण्यासाठीचे प्रयत्न त्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध होत नाही ते नाहीतच. पक्षाचे संघटन वायफळ बडबडीतून उभे राहात नाही, ते संघटनकौशल्य, त्याग, साधना आणि कष्टातून उभे राहात असते. आज जोगेंद्र कवाडेंच्या सभेत जी चाहत्यांची गर्दी ओसंडून वाहते, त्यांच्या एकेका वाक्यावर जो टाळ्यांचा कडकडाट होतो, ती त्यांनी आजवर केलेल्या परिश्रम, संघर्ष आणि तपश्चर्येची फलश्रुती असते. पण, संघर्षाच्या त्या वाटेने कधी गेलेच नाहीत, त्या जयदीप कवाडेंना त्याचे महत्त्व कसे कळणार? त्यांना वाटते, राजकारण म्हणजे फक्त एकमेकांवर केलेली चिखलफेक. एकमेकांची तोंडं काळी केली, विरोधकांना कडव्या शब्दांनी रक्तबंबाळ केले की, पारड्यात पडलेल्या मतांनी ओसंडून वाहतात जणू मतपेट्या!
स्वत:ची वैचारिक उंची, मतभेदांचे गांभीर्य, विरोधी मतांचा आदर करण्याची पद्धत, त्यांच्याशी िंकवा त्यांच्याबाबत बोलताना आब राखण्याची तर्‍हा गावीही नसल्यागत वागले जयदीप कवाडे परवा. आयाबहिणींची अब्रू वेशीवर टांगत टाळ्या मिळवण्याची त्यांची रीत, नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि जयदीप यांचे भाषण सुरू असताना मंचावर उपस्थित असलेले काही स्वनामधन्य नेत्यांचा अपवाद वगळला तर कुणालाच भावली नाही. स्मृती इराणी या भाजपाच्या नेत्या आहेत आणि भाजपा हा आपल्या विरोधी मतांचा पक्ष आहे, म्हणून स्मृती इराणींबद्दल पातळी सोडून बोलणे शोभले नाही जयदीप कवाडे यांना. कुणाच्या तरी मांडीला मांडी लावून बसण्याचा शब्दप्रयोग काय, कपाळावरच्या कुंकवाचा आकार नवर्‍यांच्या संख्येशी जोडणे काय... छे! छे! माफ करणे तर सोडाच, पण विसरण्यासारखेही बोलले नाहीत कवाडे त्या सभेत.
 
 

 
ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मताधिकार बहाल केला, तो बहाल करताना जरासाही भेद केला नाही, गरीब आणि श्रीमंत माणसाच्या मताची िंकमत एकच राहील याची काळजी घेतली, त्या बाबासाहेबांनी महिलांना सन्मान मिळवून दिला, पुरुषांसमवेत त्यांना समान अधिकार दिला... पण, जयदीप कवाडे यांनी मात्र परवा त्याच महिलांचा धडधडीत अपमान केला. कपाळावरच्या कुंकवाचा आकार त्या महिलेच्या नवर्‍यांच्या संख्येवरून ठरतो? कुठून लावला हा जावईशोध त्यांनी? आपण एका जाहीर सभेत बोलतो आहोत, या देशाच्या केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदावर कार्यरत असलेल्या एका महिलेबद्दल बोलतो आहोत, आपले बोलणे ऐकण्यासाठी समोर बसलेल्या श्रोत्यांमध्येही महिला उपस्थित आहेत, यापैकी कशाचेच भान न राखता बेछूट बरळत सुटले ते. आपल्या बोलण्यातून तमाम महिलावर्गाची िंनदानालस्ती होत असल्याची, आपल्याच समाजातील आयाबहिणींच्या इभ्रतीचे वाभाडे आपणच जाहीर रीत्या काढत असल्याचीही जाणीव त्यांना राहिली नाही.
या देशात कुंकू हे केवळ सौंदर्याचे नाही, तर सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ग्रामीण भागात कितीतरी महिला कपाळावर भले मोठे कुंकू लावतात. राजकारणात वावरणार्‍या महिलांपैकीही अनेक महिला मोठ्या आकाराचे कुंकू लावतात. स्मृती इराणी यांच्या कपाळावरील कुंकवाचा आकार हा पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. एरवी, व्यक्ती आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे उच्चरवात स्तोम माजवणार्‍या जयदीप कवाडेंनी त्याचा असा अभद्र अर्थ काढण्याचा करंटेपणा, हे राजकारणाच्या हीन पातळीचे दर्जाहीन उदाहरण आहे. कवाडेंनी नेमके त्याचेच दर्शन घडविले आहे.
राजकारणात विरोध असतो, दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधील लोकांमध्येच नाही, तर एकाच पक्षातल्या दोन नेत्यांमध्येही विस्तवही जात नाही कित्येकदा. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतात, एकदुसर्‍याचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न होतो, निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याचा प्रयत्नही नवीन नाही, सत्ता काबीज करण्यासाठी लढवले जाणारे डावपेच हा तर चर्चा अन्‌ अभ्यासाचाही विषय ठरू शकेल कदाचित. पण, म्हणून कुणाचे चारित्र्यहनन करण्याचा, त्यातही महिलांबद्दल अश्लील बोलण्याचा प्रकार समर्थनीय कसा ठरू शकेल? नागपूरच्या बगडगंज परिसरात कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत भाषण करताना जयदीप कवाडेंचा तोल सुटला अन्‌ मग बेताल बरळत सुटलेत ते. भाजपाला विरोध करण्याच्या नादात, त्या पक्षाच्या नेत्यांवर टीकेची झोड उठविण्याच्या नादात, आपण समस्त महिलावर्गाचा धडधडीत अपमान करीत असल्याचे वास्तव नजरेआड झाले अन्‌ जीवनात राजकारणाला अवास्तव महत्त्व देण्याच्या ईर्ष्येत माणुसकीची रया घालवीत असल्याचे भान हरवून बसले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कथित युवानेते... त्यांच्या बेताल बरळण्यावर आक्षेप नोंदवायचे सोडून टाळ्या पिटणारे बघे, मंचावर बसून हा तमाशा मूकपणे ऐकत, बघत राहिलेले कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी कवाडेंच्या आक्षेपार्ह बरळण्याला दिलेले निलाजरे समर्थनही दुर्दैवी आहे. कॉंग्रेस पक्षात महिलांना कशी हीणकस वर्तणूक दिली जाते, महिलांचा आदर हा त्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी किती क्षुल्लक मुद्दा आहे, याचे किस्से कालपर्यंत चर्चिले जात होते. ऐकिवात होते. कॉंग्रेसच्या मंचावरून महिलावर्गाच्या अब्रूची धिंड काढणार्‍या जयदीप कवाडेंच्या भाषणावरील कॉंग्रेसनेत्यांचेे मौन, त्या सर्वांवर कडी करणारे ठरले आहे. कवाडेंच्या भाषणातील गैरलागू मुद्यांवर अन्‌ महिलांच्या इभ्रतीच्या त्यांनी मांडलेल्या बाजारावर समोर बसलेल्या महिलांनी शरमेने खाली घातलेल्या माना बघून मंचावरील कुणालाही जराशीही लाज वाटली नाही, याहून दुसरे दुर्दैव ते कोणते असणार?
एव्हाना, या प्रकरणात राजकीय पातळीवर तक्रारी नोंदवणे सुरू झाले आहे. झाल्या प्रकाराचा निषेधही होतो आहे सर्वदूर. निवडणूक आयोगाकडे तक्रारींची नोंद होईल. कदाचित एखाद्दुसरी नोटीस, दंड, भाषणावरील बंदीसारखी कारवाईदेखील होईल. कदाचित कवाडेकृत माफीनाम्याचे अस्त्र बाहेर काढून या प्रकरणावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न होईल. पण, एका महिलेचा सन्मान हा असा राजकीय पातळीवरील कारवाईच्या तराजूत कसा मोजता येईल? महिलांची अब्रू हा काय राजकारणाचा विषय आहे? महिलांची इभ्रत हा काय खिल्ली उडवण्याचा विषय आहे? आपल्या पक्षात नसलेल्या महिलांबाबत असली भावना ठेवून काम करते कॉंग्रेस अन्‌ कवाडेंची पीपल्स रिपब्लिकन पार्टी?
जोगेंद्र कवाडे सरांच्या छत्रछायेत वाढण्याचे भाग्य लाभल्याने, स्वत:च्या राजकीय पक्षाचे नेतेपद सहजासहजी पदरी पडलेल्या जयदीप कवाडेंना महिलांची बूज राखण्याचे शहाणपण साधले नसेल, नाना पटोलेंनाही जयदीप यांची बेताल बडबड ओंगळवाणी वाटली नसेल, तर आता समाजानेच यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याची हिंमत पुन्हा कधी कुणाला होऊ नये, अशी अद्दल नागरिकांनी घडवली पाहिजे यांना आता...