टिमकी वाजवावीच लागेल!
   दिनांक :04-Apr-2019
देशातील इनेगिने विरोधक पार डबघाईला आले आहेत! स्वत:च्याच डबक्यात चाबकडुबक करीत आहेत! हे डबकं वाढविण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही! विरोध या नात्याने स्वत:ची जबाबदारी पार पाडण्याची कधी कोशीश केली नाही. त्याबाबत त्यांचे कसब केव्हाही स्पष्ट झाले नाही. ‘आडात नाही, तर पोहर्‍यात कुठून येणार?’ अशी मल्लिनाथी त्यावर करण्यास त्यांनी वाव ठेवला. नकारघंटा वाजविणे यालाच ते विरोध समजले! त्यामुळे त्यांचे डबके डबकेच राहिले! त्यात होते नव्हते ते पाणीही आता आटू लागले आहे; चिखल तेवढा राहिला आहे! त्या चिखलातच हात मारून, िंशतोडे उडविण्याच्या त्यांच्या चेष्टा सुरू आहेत! विधायक विरोध करत आले असते, तर जनतेला त्यांच्यात पर्याय आढळला असता! त्यांनी स्वत:चे नुकसान करून घेतलेच, सोबत देशाचेही! लोकशाहीत विरोधक मजबूत हवेत, कार्यक्षम हवेत, परिपक्व हवेत, देशापुढील समस्यांची जाण ठेवणारे हवेत. क्षमताही हवी आणि नेट-प्रॅक्टिसही हवी! दुर्दैवाने विरोधक याबाबत फार कमी पडले आहेत. ही उणीव भरून काढण्यासाठी सध्या त्यांचे प्रयत्न निमित्त शोधण्यापुरते मर्यादित झाले आहे. सकारात्मक असे काहीही केले नसल्याने, दोरीला साप संबोधून लोकांना घाबरवून सोडण्याची चाल खेळायची; नसते ते बागुलबुवा उभे करून बुवाबाजी करायची, खोटेनाटे आरोप सातत्याने करीत राहायचे, स्वत:ला थोर म्हणायचं, सत्ताधार्‍याला चोर म्हणायचं- या सार्‍या कसरती करून आपण आपल्याच सन्मानाला कसर लावून घेत आहोत, हे कोणीतरी यांना सांगणे गरजेचे आहे. कोणी सांगण्यास पुढे येत नसेल, तर जनता त्यांना जमेस धरणार नाही!

केवढी थिल्लर विधाने करीत आहेत, ही मंडळी एवढ्यात. ज्यांना राजकारणातले ‘अबकड’ माहीत नाही, असे बापाच्या आयत्या पीठावर, बापालाच बाजूला सारून रेघोट्या मारणारे लेकरेबाळं, केवळ जातीच्या एकमेव आधारावर नेते झालेले आणि जातीपुरतेही मर्यादित नसलेले, काल-परवा उगवलेले मशरूम जेव्हा वटवृक्षांना आव्हान देऊ लागतात, तेव्हा त्यांच्या राजकीय अस्तित्वाची िंचता वाटू लागते. देशाला सक्षम विरोधकांची आवश्यकता आहे, सवंग विरोधकांची नव्हे, याची त्यांना जाणीव नसेल, वा जाणीव असूनही त्याला ते महत्त्व देत नसतील, तर ते कार्य जनतेलाच करावे लागेल, त्यांना त्यांची जागा दाखवून मार्गावर आणण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.
गुजरातमधील सत्ताधारी भाजपानेते मला घाबरले आहेत, अशी वल्गना, गेल्या पंधरवड्यात अशाचपैकी एकाने केली! तो स्वत:ला राजकीय मल्ल समजतो! स्वत:च्या जोरावर अद्याप एकही कुस्ती त्याने मारली नाही, तरी समजतो! भोवतीची गर्दी पाहून चेकाळतो! ‘कुठे आहे तो हत्ती, चिलटासारखा चिरडतो त्याला’, असे आव्हान देतो! पात्रता-फेरीत अद्याप उत्तीर्ण न झाल्यावरही आपण रिंगणातच आहोत, अशा आविर्भावात दंड थोपटतो! ‘िंजकलो रे िंजकलो’, म्हणून स्वत:च्या एका हाताने आपला दुसरा हात उंचावतो! कुस्तीत उतरण्यापूर्वीच स्वत:च तिचा निकाल घोषित करतो! उमेदवारांच्या शोधात असलेल्या, सुमारे 135 वर्षे जुन्या पक्षाने त्याला लगेच आपला गंडा बांधला!
विरोधकांची स्थिती ही अशी झाली आहे! नशिबी विन्मुखता आली आहे! स्वत:च्या पक्षात उमेदवारांची चणचण भासू लागली असल्याने जो भेटेल त्याला पुरस्कृत करणे सुरू आहे! मशरूमांना वृक्ष म्हणून प्रोजेक्ट करणे सुरू आहे. ना नवरदेव सापडत आहे ना वर्‍हाडी! त्यामुळे, बोहल्यावर चढण्यासाठी समोरचा उत्सुक असो वा नसो, कोणतीही शहानिशा न करता, त्याला मुंडावळी बांधणे सुरू आहे! शहनाईतून सुस्वर काढता येत नसतानाही ती फुंकणे चालू आहे! काय करतील बिचारे विरोधक! समोर नगारा आहे, तरी टिमकी वाजविणे सुरूच ठेवावे लागेल ना!