निस्सानच्या माजी प्रमुखांना परत अटक
   दिनांक :04-Apr-2019
टोकियो, 
निस्सानचे माजी प्रमुख कार्लोस घोसन यांना गुरुवारी सकाळी परत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या नव्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती, असेही वृत्तात म्हटले आहे.
 

 
 
यापूर्वी ते 100 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होते. नाट्यपूर्ण घडामोडीनंतर मुक्त करण्यात आल्यानंतर प्रशासनाने त्यांना परत अटक केली. त्यांच्या टोकियो येथील निवासस्थानात गुरुवारी सकाळी सरकारी वकील गेले. त्यानंतर लगेच त्यांना एका कारमध्ये नेण्यात आले, अशी माहिती सरकारी वृत्तवाहिनी एनएचके आणि इतर प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
 
त्यांना अटक होत असल्याची कुणकूण प्रसारमाध्यमांना लागल्याने त्यांनी तेथे गर्दी केली. त्यामुळे त्यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीच्या बाहेर गडद सुटातील तीन व्यक्ती पहारा देत होत्या. या इमारतीसमोर एक पार्क करण्यात आली होती आणि 12 पेक्षा जास्त पोलिस अधिकारी गस्त घालत होते, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
 
त्यांनी 32 लाख डॉलर्सचा निधी ओमान येथील एका वितरकाला हस्तांतरीत केला. या दाव्याचा तपास करण्यासाठी त्यांना अटक करण्याची तयारी केली जात असल्याचे वृत्तही बुधवारी प्रसारमाध्यमांनी दिले होते. या पैशांमधून घोसन व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आलिशान बोट विकत घेण्यात आल्याचा संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.