मोदींची सभा आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला अपघात
   दिनांक :04-Apr-2019
गोंदिया येथील नवीन बायपास मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला बुधवारी रात्री अपघात झाला. या अपघातात ११ जण जखमी झाले असून जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. गोंदिया-आमगाव मार्गावर ठाणा गावाजवळील गोरेगाव मार्ग वळण रस्त्यावर हा अपघात झाला.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदियात सभा घेतली. या सभेसाठी पुण्यातील पोलिसांचे एक पथकही आले होते. बुधवारी सभा संपल्यानंतर पोलीस कर्मचारी पुण्यात परतत होते. रात्री १० च्या सुमारास गोंदिया-आमगाव मार्गावर ठाणा गावाजवळ बस उलटली. या अपघातात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले.
जखमींमध्ये पोलीस शिपाई भरत धोंडीराम मालवदे, एएसआय चुन्नीलाल राठोड, अमित जगताप, डी. डी. डांगे, राहुल लोंढे, विशाल कांबळे, समर बनसोडे, एम.जे.कोळी, सत्यवान कांबळे, रवि नेवाले व विशाल कांबळे यांचा समावेश आहे. जखमीपैकी ४ ते ५ पोलीस गंभीर असल्याने त्यांना डॉ. बजाज यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.