अनेक आजी-माजी मुख्यमंत्री पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत
   दिनांक :04-Apr-2019
 श्यामकांत जहागीरदार
 
विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. विरोधी पक्षांच्या महाआघाडीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राकॉंचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बसपाच्या नेत्या मायावती यांच्यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांचीही भर पडली आहे. चंद्रशेखर राव यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीला आपला पािंठबा राहणार असल्याचे प्रतिपादन एआयएम आयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांनी नुकतेच जाहीर केले आहे.
विरोधी पक्षांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारांचे प्रमुख वैशिष्ट्‌‌‌य म्हणजे यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंधप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव या तीन विद्यमान मुख्यमंत्र्यांचा तसेच शरद पवार आणि मायावती या दोन माजी मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे तर मायावती यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. भाजपा आघाडीत सहभागी झाले नसते, तर बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेते नितीशकुमारही पंतप्रधानपदाचे आणखी एक दमदार दावेदार राहिले असते.
या सवार्र्चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सर्वांनी एकापेक्षा जास्त वेळ मुख्यमंत्री पद भूषवले आहे. शरद पवार, मायावती आणि चंद्राबाबू नायडू यांनी तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले. तर ममता बॅनर्जी आणि चंद्रशेखर राव यांची मुख्यमंत्रिपदाची दुसरी टर्म सुरू आहे. शरद पवार आणि ममता बॅनर्जी तर केंद्रातही मंत्री होते. यातही शरद पवार यांचा प्रशासकीय अनुभव सर्वांत जास्त म्हणावा लागेल.
 

 
 
 
पंतप्रधानपदाच्या दावेदारांत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच सर्वात अननुभवी आहेत. राहुल गांधी आतापर्यंत तीनदा खासदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांना मंत्री वा मुख्यमंत्री म्हणून प्रशासकीय कामकाजाचा कोणताही अनुभव नाही. डॉ. मनमोहनिंसग यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राहुल गांधी यांनी आपल्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी व्हावे, असा अनेक वेळेला आग्रह धरला होता. पण त्यावेळी राहुल गांधी यांनी मंत्री होण्यास नकार दिला. त्यावेळी मंत्री झाले असते तर राहुल गांधी यांना खूप काही शिकता आले असते आणि त्यांची प्रशासकीय अनुभवाची पाटी कोरी राहिली नसती.
योगायोग म्हणजे भाजपा आणि रालोआचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार असलेले नरेंद्र मोदीही गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच मोदी यांना भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले होते. मोदी यांनी चारवेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद यशस्वीपणे सांभाळले.
मुख्यमंत्री असण्याचा फायदा म्हणजे राज्याच्या राजकारणावर आपली पकड घट्ट करत असताना राज्यातील विविध कामांसाठी सतत दिल्लीला यावे लागत असल्यामुळे केंद्राच्या राजकारणाची तसेच प्रशासकीय चौकटीची माहिती होत असते. केंद्रात सत्तेवर येताक्षणीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर आपली घट्ट पकड बसवता आली, यामागचे प्रमुख कारण त्यांनी आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेले काम.
 
मात्र याचा अर्थ असा बिलकुल नाही की मुख्यमंत्री पद न भूषवलेले आणि थेट पंतप्रधान झालेले यशस्वी होऊ शकत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू लगेच पंतप्रधान झाले होते. लालबहादूर शास्त्रीही नेहरूनंतर थेट पंतप्रधान झाले. पंतप्रधान व्हायच्या आधी श्रीमती इंदिरा गांधी केंद्रात मंत्री होत्या. मात्र हे तिघेही राज्याच्या राजकारणात कधीच नव्हते, तर सुरुवातीपासूच राष्ट्रीय राजकारणात होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नव्हता.
आधी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि नंतर जनता पक्षाच्या राजवटीत पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या आधी 1952 मध्ये मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
6 महिन्यांपेक्षाही कमी काळासाठी चौधरी चरणिंसह देशाचे पाचवे पंतप्रधान झाले. 28 जुलै 1979 ते 10 जानेवारी 1980 पर्यंत चरणिंसग पंतप्रधान होते. चरणिंसग यांनी दोनदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवले.
विश्वनाथप्रतापिंसह यांना वर्षभरच पंतप्रधानपद सांभाळता आले. 9 जून 1980 ते 19 जुलै 1982 अशी दोन वर्षे व्ही.पी. िंसग यांनी उत्तरप्रदेशचे बारावे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान झालेले पी. व्ही. नरिंसहराव पंतप्रधानपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे गांधी नेहरू घराण्याबाहेरचे पहिले पंतप्रधान होते. 30 सप्टेंबर 1970 ते 10 जानेवारी 1973 याकाळात नरिंसहराव आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते.
 
या सर्व नेत्यांचे मुख्यमंत्रिपद ते पंतप्रधानपद यात खूप अंतर होते. मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदींच्या आधीचे नेतेे म्हणजे एच.डी. देवेगौडा. 11 डिसेंबर 1994 ते 31 मे 1996 पर्यंत देवेगौडा कर्नाटकचे मु़ख्यमंत्री होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री असतानाच त्यांना अचानक पंतप्रधानपदाची लॉटरी लागली. 1 जून 1996 ते 10 एप्रिल 1997 अशी जवळपास दहा महिने देवेगौडा पंतप्रधान होते.
अनेक राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री आणि काही माजी मुख्यमंत्री पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत गुडघ्याला बािंशग बांधून का उतरले याचे उत्तर पंतप्रधानदाच्या या इतिहासात आहे.
 
9881717817