जनताच दाखवेल त्यांना जागा!
   दिनांक :04-Apr-2019
ही तो रश्रींची इच्छा! 
र. श्री. फडनाईक 
 
गौतम गंभीरची ओळख सांगण्याची गरज नाही. चौफेर टोलेबाजीसाठी ख्यात असलेला हा क्रिकेटपटू एवढ्यातच भाजपामध्ये अधिकृतरीत्या दाखल झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नि:स्वार्थ आणि सक्षम नेतृत्वाने प्रभावित होऊन मी या पक्षात आलो आहे, असे त्याने पक्षात प्रवेश करताना सांगितले.
उमर अब्दुल्ला यांची थोडक्यात ओळख अशी : ते नॅशनल कॉन्फरन्स या, जम्मू-काश्मीरशी सीमित असलेल्या पक्षाचे नेते आहेत व जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत.
 
 
 
 
मीडियातील वृत्तानुसार, दि. 1 एप्रिल रोजी उमर अब्दुल्ला एका जाहीर सभेत म्हणाले, आमचा प्रयत्न जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्याचा आहे, जेणेकरून या राज्याला पुन्हा पंतप्रधानपद प्राप्तीचा दर्जा राहील. अर्थ असा, की भारताचे दोन पंतप्रधान राहतील; एक जम्मू-काश्मीरचा आणि दुसरा उर्वरित भारताचा. सारांशात उमर अब्दुल्ला आणि त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला जम्मू-काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान हवा आहे.
 
उमर अब्दुल्ला यांचे हे स्वप्नरंजन आहे आणि असे स्वप्न बाळगणे हे देशविघातक आहे, अशा आशयाची चौफेर टीका त्यावर झाली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची गंभीर दखल घेतली. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याच्या हातात हात गुंफणार्‍या तथाकथित महागठबंधनातील इतर पक्षांची याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात विरोधकांचे जे महासंमेलन आयोजित केले होते आणि ज्या गॅदरिंगमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते जातीने उपस्थित होते, त्या संमेलनाच्या आयोजक राहिलेल्या ममता दीदींना त्यांनी थेट प्रश्न विचारला. त्याचे उत्तर अद्याप यायचे आहे!
 
इकडे गौतम गंभीर मात्र जाम भडकला. त्याने वेगळेच निदान केलेले दिसते उमरजीबाबत! (जी लावायला आम्ही विसरलो नाही!) त्यांना थोड्या झोपेची गरज आहे, असे गंभीर गंभीरपणे म्हणाला. उमर अब्दुल्ला यांना इन्सोम्निया (निद्रानाश) झाला असावा, असे गंभीर यांना म्हणायचे असावे! पुरेशी झोप न झालेली व्यक्ती चिडचिड करते, त्या अवस्थेत असंबद्धही बोलते, तिची पचनक्रिया बिघडते, असे डॉक्टर सांगतात! तशी काही लक्षणे गौतम गंभीरला दिसली का उमरसाहेबांमध्ये? दिसली असतीलही, तरी त्यावर उपचार घेण्यासाठी त्यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला कशाला द्यायचा! तिथल्या, या प्रकारात मोडणार्‍या पेशंट-संख्येत आणखी एकाची भर कशाला! तिथल्या नेत्यांनी आणि लष्करी अधिकार्‍यांनी सारे उपाय करवून घेतल्यावरही त्यांच्या स्थितीत अजूनपर्यंत काही फरक पडलेला नसताना, तिथे यावर काय उपाय होणार! त्यापेक्षा इथल्याच आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला त्यांना गंभीरने द्यायचा होता! योगा करण्यास सांगायचे होते! शीर्षासन करायला सांगायचे होते! शीर्षासनाने मेंदूला पुरेसे रक्त पोहचते. त्या भागातले रक्ताभिसरण सुव्यवस्थित होते!
एवढ्यानेच संपले नाही; आपला चष्मा साफ करण्याचाही सल्ला गंभीरने त्यांना दिला! त्यासाठी स्वच्छ रूमाल पाठविला का, याचा तपशील बातमीत नाही. पाठवायला पाहिजे. सर्दीत कामात आला असता! पुरेशी झोप झाली नाही, की अलर्जी होण्याचीही शक्यता असते, नाक गळायला लागते!
 
जम्मू-काश्मीरच्या इतिहासाला आकार देण्यात नॅशनल कॉन्फरन्सच्या भूमिकेचा अभ्यास नसताना, तुम्ही त्यावर बोलू नये, तसा अट्टहास करू नये, असा उमर अब्दुल्ला यांनी पलटवार केल्याचा या वृत्तात उल्लेख आहे. हे बरोबर आहे! गंभीरने हा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे होता. काश्मीरचे तेव्हाचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांना 1953 मध्ये कोणत्या कारणाने अटक करण्यात आली होती आणि मुख्यमंत्रिपदावरून का पदच्युत करण्यात आले होते; सुमारे 10 वर्षे त्यांना तुरुंगात का ठेवण्यात आले होते, हे गंभीरने जाणून घ्यायला पाहिजे होते!
तूर्त, गंभीरने उमर अब्दुल्ला यांना पाकिस्तानचा पासपोर्ट काढून घेण्याचा सल्ला देऊ नये! पासपोर्ट मिळाला, तरी त्यांना व्हिसा मिळणार नाही! स्वत:च्या देशाच्या एका भागाला स्वायत्तता मागून त्या भागासाठी वेगळ्या पंतप्रधानाच्या पदाची जे लोक मागणी करीत आहेत, त्यांना कोणी कशाला प्रवेश देईल हो! त्यामुळे येथील जनतेलाच त्यांच्याबाबत निर्णय घेऊ द्या! येत्या निवडणुकीत त्यांना आणि त्यांच्या हातात हात गुंफणार्‍यांना कबाडखान्यात पाठवू द्या! त्यांची जागा त्यांना दाखवेल जनता!