'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर
   दिनांक :04-Apr-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचे प्रदर्शन अखेर पुढे ढकलण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. दिल्ली, मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण, हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भातील याचिकेच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार झाले असून, ८ एप्रिल रोजी यावरील याचिकेची सुनावणी होणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे, असे निर्माता संदीप सिंह यांनी ट्विटवरून सांगितले.
 
 
केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळानेही या चित्रपटाचे प्रमाणपत्र रोखून धरले होते. २९ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे सदर चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे हा चित्रपट आता १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती यावी, यासाठी वकील अमन पवार यांनी याचिका दाखल केली आहे. दोन उच्च न्यायालयांनी या चित्रपटावरील स्थगितीस नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे प्रदर्शन मतदारांवर प्रभाव पाडू शकते, अशी बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती एस. ए. भोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर करण्यात येणार आहे.