भारत सर्वाधिक कर असलेला देश- ट्रम्प यांचा त्रागा
   दिनांक :04-Apr-2019
वॉशिंग्टन,
जगातील सर्वाधिक कर आकारणी करणार्‍या देशांपैकी भारत एक आहे, असा त्रागा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून, हार्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींसह इतर अमेरिकी उत्पादनांवर भारताकडून होणार्‍या 100 टक्के कर आकारणीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची उच्च कर आकारणी योग्य नाही, असे त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस सभागृह समितीच्या वार्षिक स्नेहभोज कार्यक्रमात सांगितले.
 

 
दुहेरी कराला पािंठबा मिळावा यासाठी त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये स्नेहभोज कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी त्यांनी हार्ले-डेव्हिडसन मोटारसायकलवरील कर 100 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आणण्याच्या भारताने घेतलेल्या निर्णयावर समाधान व्यक्त करीत, हे पुरेसे नसले, तरी ठीक आहे, असे म्हटले होते.
भारत हा करांचा राजा आहे आणि अमेरिकी उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात करआकारणी केली जाते, असा आरोप ते सातत्याने करीत आहेत. जगातील सर्वाधिक कर आकारणार्‍या देशांपैकी भारत एक आहे. ते आपल्या उत्पादनांवर 100 टक्के करआकारणी करतात, असे भारताच्या करआकारणीवर नेहमीप्रमाणे कठोर वक्तव्य त्यांनी यावेळी केले.