तेजप्रतापचे तेजस्वीविरुद्ध उघड बंड
   दिनांक :04-Apr-2019
बि
हारमध्ये एकीकडे राजदला कॉंग्रेसच्या असंतोषाचा सामना करावा लागत असतानाच, आता लालू यादव यांच्या कुुटुंबातील भाऊबंदकी समोर आल्याने अख्खे यादव कुटुंबीय त्रासून गेले आहे. सध्या राजद चालवीत असलेले तेजस्वी यादव यांची डोकेदुखी तर तेजप्रतापने आणखीनच वाढविली आहे. वास्तविक पाहता, तेजप्रताप हा तेजस्वीपेक्षा मोठा भाऊ. पण, सारा कारभार तेजस्वीच्या हाती असल्याने तेजप्रताप हे खवळले आहेत. त्याचे कारण म्हणजे, त्याच्या पसंतीच्या एकाही उमेदवाराला जागा न देणे. त्यामुळे त्याने जाहीर बंड पुकारले आहे.

लालू यादव यांचे कुटुंबीय फार मोठे. म्हणजे लालूंसारखा लेकुरवाळा नेता फार विरळाच. लालूंना सात मुली आणि दोन मुले आहेत. त्यापैकी आणिबाणीच्या काळात जी मुलगी जन्माला आली, तिचे नाव लालूंनी मिसा भारती ठेवले. तीच आता राजकारणात असलेली मिसा भारती. 90 च्या दशकात त्यांना पत्रकारांनी मिश्किल प्रश्न विचारला होता की, लालूजी, पुरी क्रिकेट टीम बनाने का इरादा है क्या? तेव्हा लालूही तेवढ्याच मिश्किलपणे म्हणाले होते- बहोत चर्चा हो रहा है...बच्चे तो भगवान का देन है... आणि हळूच मग अब हमने ये प्रोग्राम बंद कर दिया है...हे उत्तर ऐकताच प्रचंड हशा पिकला होता. पण, काळ जसजसा पुढे जात गेला, मुलं मोठी होत गेली. आता सातही मुलींचे लग्न झाले असून त्या आपापल्या घरी सुखी आहेत. घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाल्याने साहजिकच मुलांमध्येही राजकारणात येण्याचा कल वाढू लागला. त्यात तेजप्रताप, तेजस्वी आणि मुलगी मिसा भारती हे तिघेच राजकारणात आहेत. पण, सत्तेचे सुख काही और असते. लालूंना कारावास झाल्यानंतर आधी राबडी देवी मुख्यमंत्री झाल्या आणि नंतरच्या काळात नितीशकुमार यांच्यासोबत हातमिळवणी केल्यामुळे तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. तेजप्रताप यांना आरोग्य मंत्रिपद मिळाले. पण, नंतर नितीशकुमार यांनी राजदशी युती तोडली व भाजपासोबत युती केली. नंतरचा घटनाक्रम सर्वांनाच माहीत आहे.
यावेळी राजदवर तेजस्वी नावाचा ताराच चमकत आहे. त्यांनी आपल्या मर्जीच्या जागांवर उमेदवारही देऊन टाकले. पण, तेजप्रताप यांना ते सहन झाले नाही. त्यांनी तेजस्वीकडे चार जागा मागितल्या. पण, तेजस्वीने ताकास तूर लागू दिली नाही. म्हणून मग तेजप्रतापने वेगळा पक्षच काढला. लालू-राबडी मोर्चा! चार ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार उतरविण्याचा निर्णय घोषित करून टाकला. या चार जागा आहेत, जेहानाबाद, शिवहर, सारण आणि आणखी एक जागा अजून घोषित केली नाही. जेहानाबादमध्ये तेजस्वीने उमेदवार घोषित करून टाकला आहे. पण, शिवहरमध्ये सध्या कुणाचे नाव निश्चित केलेले नाही. तिसरी बाब म्हणजे सारणची जागा. तेजप्रतापची मागणी आहे की, सारण जागा ही आई राबडी देवी यांना द्यावी. त्यासाठी मी आईकडे आग्रह धरणार आहे. पण, जर आईने नकार दिला तर तेथे सुद्धा आम्ही उमेदवार उभा करू िंकवा मी स्वत: तेथून उभा राहीन. तेजस्वीने येथे तेजप्रतापचे सासरे चंद्रिका राय यांना तिकीट दिले आहे. यालाही तेजप्रतापने तीव्र विरोध दर्शविला आहे.
जेहानाबादचे राजद उमेदवार सुरेंद्र यादव यांनाही तिकिट देण्यास तेजप्रतापचा विरोध आहे. त्याचे कारण क्षुल्लक असले तरी, तेजप्रतापने तो मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. झाले असे की, सुरेंद्र यादव आणि तेजप्रताप यांचे घर जवळजवळ आहे. काही महिन्यांपूर्वी लग्नाची वरात सुरेंद्र यादव यांच्या घराजवळ आली आणि त्यात मोठमोठ्याने लाऊडस्पीकर वाजवण्यास तेजप्रतापने विरोध केला. कारण, त्याची झोप खोळंबत होती. त्याला सुरेंद्र यादव यांनी विरोध केला. लाऊडस्पीकर वाजेल असे सुरेंद्र यादव यांनी सुनावले व जे करायचे आहे, ते करून घे अशी धमकी दिली. यावरून प्रकरण एवढे वाढले की, दोघांचेही कार्यकर्ते मारामारीवर आले आणि त्यात अनेक जखमी झाले. नंतर तेजस्वीने मध्यस्थी करून दोघांचीही समजूत काढली. पण, तेजप्रतापने आपल्या मनात अपमानाची भावना कायम ठेवली. म्हणून, तेजप्रतापने जेहानाबादमधून लढण्याचा निर्णय घेतला. सुरेंंद्र यादव हे जेहानाबादमधून तीनदा पराभूत होऊनही त्यांना तिकिट का दिले, असा तेजप्रतापचा प्रश्न आहे. तेजप्रतापने नुकताच राजद विद्यार्थी संघटनेच्या संरक्षकपदाचाही राजीनामा दिला आहे, तो यामुळेच.
तेजप्रताप आणि त्यांचे सासरे चंद्रिका राय यांचेही मोठे भांडण आहे. कारण, तेजप्रतापने आपली पत्नी ऐश्वर्या हिला सोडचिठ्ठीची दिलेली नोटीस. लालूंपासून राबडी आणि तेजस्वीपासून सर्व बहिणींनी समजावूनही तेजप्रताप मात्र नोटीस मागे घेण्यास तयार नाही. आता तो कुटुंबापासून वेगळा राहतो.
त्यामुळे आता तेजस्वीपुढे मोठाच पेच निर्माण झाला आहे. आधीच कॉंग्रेसमध्ये धुसफूस. वरून तेजप्रतापचे हे प्रताप. चार जागा कमी नाहीत. तेथे जर तेजप्रतापचे उमेदवार मैदानात आले तर ते राजदचीच मते ओढणार, हे सांगण्याची गरज नाही. तेजप्रतापची समजूत घालण्यासाठी आता तेजस्वीने पिता लालू आणि माता राबडी देवींकडे धाव घेतली आहे. पण, तेजप्रतापचा अवतार पाहता तो मानेल अशी कोणतीही चिन्हे नाहीत.
एकीकडे खूप गाजावाजा करून कथित महागठबंधन तर झाले, पण यातील कोणताच पक्ष समाधानी नाही. राजद, कॉंग्रेस यांच्यात बेननाव आधीच निर्माण झाला आहे. आता तेजप्रतापला सांभाळता सांभाळता तेजस्वीच्या नाकी नऊ आले आहेत.
पप पप