मी उधारीवर जगतोय्‌, खाती गोठवू नका!- विजय मल्ल्याची याचना
   दिनांक :04-Apr-2019
लंडन,
भारतातील बँकांचे सुमारे 9400 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याची बँक खाती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होताच, या कारवाईवर स्थगिती आणण्यासाठी मल्ल्याने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात त्याने स्वत:ची आर्थिक विवंचनाच ऐकवली. माझ्याकडे पैसे नाहीत. पत्नीच्या पैशावर माझा उदरनिर्वाह चालतो. काही जवळचे लोक, ओळखीचे उद्योजक आणि मुलांकडून उधारी घ्यावी लागते, त्यावरच मी जगत आहे, असेे सांगताना, माझी बँक खाती गोठवली जाऊ नये, अशी याचना त्याने केली आहे.
 
 
 
ज्या 13 बँकांचे मल्ल्याने कर्ज थकवले आहे, त्या बँकांनी गेल्यावर्षी 11 सप्टेंबर रोजी त्याच्या विरोधात न्यायालयात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्यात यावे, अशी विनंती त्यात करण्यात आली आहे. याच याचिकेवरील एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने न्यायालयाला बँक खाती न गोठविण्याची आणि दिवाळखोर जाहीर न करण्याची विनंती केली आहे.
माझी व्यक्तिगत संपत्ती 2,956 कोटी रुपये इतकी राहिली आहे. बँकांशी तडजोड करण्यासाठी या संपूर्ण संपत्तीची माहिती कर्नाटक उच्च न्यायालयात सादर केली असल्याचे त्यानं म्हटले आहे.
पत्नीची कमाई 1.35 कोटी
मल्ल्याची भागीदार आणि पत्नी िंपकी ललवाणी वर्षाला सुमारे 1.35 कोटी रुपये कमावते. त्याची पर्सनल असिस्टंट महल आणि एक ओळखीचा उद्योगपती बेदीकडून त्याने अनुक्रमे 75.7 लाख आणि 1.15 कोटी रुपये उधार घेतले आहेत, अशी माहिती बँकांनी न्यायालयाला दिली आहे. उदरनिर्वाह चालविण्यासाठी आणि काही कर्ज फेडण्यासाठी हे पैसे उधार घेतले आहेत, असे मल्ल्याने सांगितले. मल्ल्याने ब्रिटिश सरकारचे करापोटीचे 2.40 कोटी रुपये थकविले आहेत. तसेच माजी वकील मॅकफर्लेंस यांचे शुल्कसुद्धा त्याने थकविल्याचे अॅड. निजेल तोजी यांनी न्यायालयात सांगितले.
मल्ल्याचा दर आठवड्याचा खर्च 16.21 कोटी इतका आहे. मात्र त्याने उदरनिर्वाहासाठीच्या या खर्चात कपात करणार असल्याची माहिती त्याचे वकील जॉन ब्रिसबी यांनी न्यायालयात दिली.