तिकीटवाटपात महिलांचे प्रमाण नगण्य
   दिनांक :04-Apr-2019
पुरुष नेत्यांना महिलांकडून असुरक्षिततेची भावना वाटत असल्याचे शायना एनसी आणि अन्य पक्षातीलही महिला पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवसच उरले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे उमेदवारांची पळवापळवी सुरू असताना दुसरीकडे त्याच पक्षात निष्ठावंतांना डावलल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच पार्श्र्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी हे मत व्यक्त केले आहे.
सर्वच पक्षात महिला नेत्यांना डावललं जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वच पक्ष हे पुरुष प्रधान संस्कृतीचे असून पुरुष नेत्यांना महिलांकडून असुरक्षिततेची भावना वाटत असल्याचे त्यांचे मत आहे.
महिलांचा राजकारणातील प्रवेश आणि अस्तित्वाबद्दल शायना आक्रमक झाल्या आहेत. आता वेळ महिलांसाठी लढायची असल्याचे त्या म्हणाल्या. आता महिला वर्गाला संघर्ष करायची वेळ आली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने महिलांना तिकीट दिले पाहिजे. भाजपा असो वा कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्वच पक्षांनी महिलांना समान संधी द्यायला हवी असे त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी, नवीन पटनायक यांनी महिला उमेदवारांना प्रधान्य दिले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 

 
 
महिलांचे प्रतिनिधित्व तोकडे
राज्यात पुरूष मतदारांची संख्या 4 कोटी 50 लाख आहे तर महिला मतदार 4 कोटी 20 लाख आहेत लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पण या राजकीय लढाईत महिला उमेदवारांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. राज्यात 8 कोटी 70 लाख मतदार आहेत. आकडेवारीनुसार राज्यात जवळपास 50 टक्के मतदार महिला आहेत. मात्र, लोकसभेची उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी आखडता हात घेतलेला दिसतो. राज्यात सर्वात जास्त महिला उमेदवार भाजपानं दिले आहेत.
भाजपा राज्यात 25 जागा लढवत आहे. त्यापैकी सात महिलांना उमेदवारी दिली. कॉंग्रेसही 25 जागा लढवत असताना उमेदवारी मात्र, केवळ तीन महिलांना देण्यात आली. राष्ट्रवादीच्या 19 जागांपैकी केवळ एक महिला उमेदवार आहे. तर शिवसेनेनंही 23 पैकी केवळ एका महिलेलाच तिकीट दिलं. भाजपाच्या महिला उमेदवार सर्वाधिक आहेत. तथापि, पक्षानं अधिक महिलांना संधी द्यायला हवी होती, असं त्यांचं मत आहे. संसदेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावं, असं सगळेच राजकीय पक्ष आक्रमकपणे मांडत असतात. मात्र, प्रत्यक्षात तिकीट द्यायची वेळ आली की या भूमिकेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे, हेच यंदाच्या निवडणुकीत सिद्ध झालं आहे.