निवडणूक काळात मोठ्या हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा
   दिनांक :05-Apr-2019
नवी दिल्ली:
 लोकसभा निवडणुकीच्या काळात जम्मू-काश्मिरात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, असा इशारा केंद्रीय गुप्तचर संस्थांनी दिला आहे. या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत.
 
 
 
पाकिस्तानच्या भूमीत आश्रयात असलेल्या जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या  दहशतवादी संघटना मोठ्या हल्ल्याची योजना तयार करीत आहे, असे गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. राज्यात ११ एप्रिल ते सहा मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
 
पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयने भारतात हल्ले करण्यासाठी अतिरेक्यांची तीन पथके तयार केली आहेत. मतदान केंद्रे आणि उमेदवार अतिरेक्यांच्या हल्ल्यांचे लक्ष्य राहणार आहेत. या पथकातील प्रत्येक अतिरेक्याला स्फोटके हाताळण्यासोबतच स्फोट घडवून आणण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे, असेही गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान निवडणुकीत व्यत्यय आणू शकतो, असा अंदाज यापूर्वीच संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या पंचायत निवडणुकीतही दहशतवाद्यांनी काही उमेदवारांना धमकावले होते. मतदानावर बहिष्कार घालण्याचा आग‘ह फुटीरतावादी गटांनी धरला होता.