अभिनेत्री मयुरी कांगोकडे ‘गुगल इंडिया’ची प्रमुख जबाबदारी
   दिनांक :05-Apr-2019
मुंबई:
 
‘घर से निकलते ही...’ या गाण्यातली अभिनेत्री मयुरी कांगो ‘गुगल इंडिया’मध्ये विभागप्रमुख म्हणून रुजू झाली आहे. मयुरीने अमेरिकेतून मार्केिंटग आणि फायनान्स विषयात एमबीएची पदवी घेतली असून, मयुरी आता ‘गुगल इंडिया’च्या उद्योग-संस्था भागीदारी विभागाची प्रमुख झाली आहे.
 
 
 
‘पापा कहते है,’ ‘होगी प्यार की जीत,’ ‘बादल’ यासारखे चित्रपट केल्यानंतर अभिनयातून संन्यास घेत मयुरीने वेगळी वाट धरली. मयुरीने ‘नसीम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नव्वदच्या दशकात ‘पापा कहते है’ चित्रपटात जुगल हंसराज आणि मयुरी कांगो या जोडीवरचे ‘घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही, रस्ते में है उनका घर’ हे गाणे चांगलेच गाजले होते.
चित्रपटानंतर मयुरी ‘नरगिस,’ ‘थोडी खुशी थोडा गम,’ ‘डॉलर बहू,’ ‘किटी पार्टी’ यासार‘या मालिकांमध्ये झळकली. मात्र, अभिनय क्षेत्रात बस्तान बसवता न आल्याने तिने क्षेत्र बदलले. २००३ मध्ये अनिवासी भारतीय आदित्य धिल्लनसोबत ती विवाहबंधनात अडकली. त्यानंतर तिने अमेरिकेची वाट धरली.
 
मयुरी याआधी एका डिजिटल मार्केिंटग एजन्सीमध्ये कार्यरत होती. तिने नेस्ले, उबर आणि एअरटेलसारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. शिक्षण सुरू असतानाच, मयुरीची निवड आयआयटी कानपूरमध्ये झाली होती, मात्र, चित्रपटांसाठी तिने तेथे प्रवेश घेतला नाही. मयुरी ही ज्येष्ठ मार्क्सवादी नेते भालचंद्र कांगो यांची कन्या आहे.