मातृत्व!
   दिनांक :05-Apr-2019
पल्लवी खताळ-जठार
 
मस्कार! अकोल्याच्या सुजाता कोपस्कर, नागपूरच्या वंदना राऊत आणि पूजा दुधांकर यांच्या प्रश्नांवर आज मी एक घडलेल्या किस्स्यांवरून उत्तर देण्याच्या प्रयत्न करतेय्‌. अर्थात तुम्हाला तुमच्या समस्यांचे निवारण या लेखातून होईल, अशी मला अशा आहे.
 

 
 
मागच्या वर्षी माझ्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आणि आम्ही शिक्षिका जरा मोकळ्या झालो. मी ठरवले पेंिंडग कामे निपटून टाकायचे म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी मी आरटीओच्या रांगेत लागले. पुढे अनेक बायका पण रांगेत होत्या. एक साधारणशी माध्यम वयाची गृहिणी देखील रांगेत अग्रेसर होती. काही वेळातच तिचा नंबर आला. त्यांचा संवाद जरा मोठ्या आवाजात होता त्यामुळे सगळं काही स्पष्ट कानावर पडत होते. त्या बाईला अधिकार्‍याने विचारले- ‘‘आपला व्यवसाय?’’ बाई जरा बुचकळ्यात पडली.
अधिकारी : बाई म्हणजे तुम्ही काही उद्योगधंदा, नोकरी करता की नुसत्याच..
बाई : छे! छे! मी गृहिणी आहे. मी 2 मुलांची आई आहे.
अधिकारी : आई हा काही व्यवसाय नाही. मी गृहिणी लिहिते. त्यात सर्व काही आले.
काहीवेळाने मला पण उत्तर द्यावे लागणार हे निश्चित होते. मी नागपूरच्या प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका आहे, असे सांगितले तर अधिकार्‍याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल म्हणून मी ठरवले, गृहिणी म्हणूनच समोर जायचे.. नंतर माझा नंबर आला मीही त्याच प्रश्नाला सामोरी गेले.. विचारणारी अधिकारी बाईच होती, पण ती जनता संपर्क अधिकारी असल्याने थोड्या ऐटीत होती.
‘‘आपला व्यवसाय?’’ तिने प्रश्न टाकला. का कुणास ठाऊक पण, मी मोठ्या रुबाबात तिला, मी बालविकास, संगोपन व आंतरव्यक्ती संबंध यातली संशोधन सहायक असल्याचे तिला सांगितले. अधिकारी बाई अवाकच झाली व एकटक माझ्याकडे बघत राहिली. मी शांतपणे व सावकाश पुन्हा एकदा मी कोण, ते तिला सांगितले आणि तिने ते व्यवस्थित लिहिले.
आता कुतूहलाने पण नम्रपणे, आपण आपल्या क्षेत्रात नक्की काय करता? तिने विचारले, शांत व आत्मविश्वासपूर्ण..
मी पुढे म्हणाले- माझा संशोधन प्रकल्प वर्षानुवर्षे चालू आहे. (सर्वाना माहिती आहे आईला निवृत्ती नाही.) हे संशोधन प्रयोगशाळा व बाहेर व्यवहारात दोन्हीकडे करावे लागते. मला दोन साहेब आहेत. (एक नियती व दुसरे माझे सर्व कुटुंब.) मला आतापर्यंत दोन पदव्यांनी भूषवण्यात आले आहे. (एक मुलगी व एक मुलगा.)
समाजशास्त्र भागातला माझा विषय हा सर्वात कठीण मानतात. (सर्व मातांचे यावर एक मत असणार.)
मला रोज 14 तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागते. कधी कधी 24 तास कमी पडतात आणि इतर अनेक पेशांपेक्षा इथे जास्त आव्हाने पेलावी लागतात. मोबदला मात्र, विशेष करून पैशात न मिळता मानसिक समाधानातच मिळतो. माझ्याविषयी तिच्या मनातला वाढत चाललेला आदर मला तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसू लागला. मसुदा पूर्ण करून ती स्वत: मला सोडायला दारापर्यंत आली. घरी परतताना मला माझ्या व्यवसायाविषयीच्या एका वेगळ्याच दृष्टिकोनामुळे खूप हलके हलके वाटू लागले.
घरात शिरताच, 5 वर्षांच्या माझ्या प्रयोगशाळा मदतनिसाने माझे स्वागत केले. बेडरूममधून मला आमच्या 2 प्रयोगाचा (5 वर्षांची जुळी लेकरू) खणखणीत आवाजातला रियाझ ऐकू येत होता. मी आज शासकीय लालफितीवर छोटासा विजय मिळवला होता. व आता मी मानव जातीला अत्यावश्यक अशा सेवेत एक उच्चपदस्थ असल्याची माझ्या नावे नोंद झाली होती.
त्यामुळे मी एक अशीच कुणीतरी आई म्हणून राहिले नाही. मातृत्व! माता हे केवढे महान पद. दारावरच्या पाटीवर हे पद असायला काय हरकत आहे? याच विचारप्रणालीमधून आजीला बालसंगोपन, विकास व आंतरव्यक्ती संबंध यातली वरिष्ठ संशोधन अधिकारी. पणजीला या प्रकल्पाच्या निदेशक म्हणावे. माझ्या मते मावशी, आत्या, काकू या सार्‍या उपसंशोधन अधिकारी आहेत. सुजाता, वंदना, पूजा तुम्ही घरी ज्या पदावर आहात, ते पद जगातले सर्वात उच्च पद आहे. स्वतःला कमी लेखू नका. आज चार िंभती या घर म्हणून संबोधल्या जात आहेत, ते केवळ तुमच्यामुळे!
संस्कृत शिक्षिका,
महाल, नागपूर