सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद
   दिनांक :05-Apr-2019
रायपूर:
 
छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी (५ एप्रिल) पहाटे चकमक झाली आहे. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील सालेघाट जंगलात ही चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

 
गुरुवारी (४ एप्रिल) छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत बीएसएफच्या चार जवानांना वीरमरण आले. तर अन्य दोन जवान जखमी झाले होते. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांकेरमधील प्रतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महला गाव येथे बीएसएफच्या ११४ व्या बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. दरम्यान, जखमी जवानांना पखांजूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांकडून आपल्या प्रभावक्षेत्रातील नागरिकांना सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत. त्यासाठी नक्षलवाद्यांकडून पत्रके वाटण्यात येत आहेत, तसेच बॅनरबाजी होत आहे. त्याबरोबरच नक्षलवादी या भागात सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करत आहेत.