राहुल गांधींकडे १५ कोटींची संपत्ती
   दिनांक :05-Apr-2019
नवी दिल्ली:
 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी यांच्या नावे एकूण १५.८८ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत राहुल गांधी यांच्या मालमत्तेत एकूण ६.४८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. राहुल गांधी यांच्याकडे २०१४ मध्ये एकूण ९.४ कोटी रुपयांची संपत्ती होती. विशेष म्हणजे त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडून ५ लाख रुपयांचे कर्जही घेतले आहे.
 
 
 
राहुल गांधी यांच्याकडे ५ कोटी ५० लाख ५८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्तेची किंमत १० कोटी ८ लाख रुपये आहे. अशारीतीने त्यांच्याकडे एकूण १५ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता आहे.
 
राहुल गांधी यांच्याकडे फक्त ४० हजार रुपये रोख रक्कम आहे. १७ लाख ९३ हजार रुपयांचे बँक डिपॉझिट आहे. यंग इंडियनचे एकूण १९०० शेअर्स त्यांच्याकडे आहेत व त्याची किंमत १९ लाख रुपये आहे. पीपीएफमध्ये ३९ लाख ८९ हजार रुपये आहेत. याशिवाय ३३३.३० ग्राम सोने आहे, ज्याची किंमत  २ लाख ९१ हजार रुपये आहे. तसेच म्युचुअल फंडमध्ये एकूण ५ कोटी १९ लाख रुपये आहेत. अशी एकूण ५ कोटी ८० लाख रुपयांची जंगम मालमत्ता राहुल गांधी यांच्याकडे आहे.
 
महरोलीच्या सुल्तानपूरमध्ये प्रियांका वढेरा आणि राहुल गांधी यांच्या नावे संयुक्तरीत्या १ कोटी ३२ लाख रुपयांची जमीन आहे. गुरुग्राममध्ये सिग्नेचर टॉवर बीमध्ये व्यावसायिक इमारत आहे, ज्याची किंमत ८ कोटी ७५ लाख रुपये आहे. अशी एकूण १० कोटी ८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता राहुल गांधी यांच्याकडे आहे.
 
राहुल गाधींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या नावे एकही गाडी नाही. तसेच त्यांच्या नावे ७२ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी ५ लाख रुपयांचे कर्ज त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडूनही घेतले आहे.