गारवा... हवा हवा...
   दिनांक :05-Apr-2019
र उन्हाळ्यात परवा एक रुग्ण लंगडत लंगडत माझ्याकडे आली. अचानकपणे तिचे गुडघे, खांदे, घोटे, मनगटं असे सांधे आखडले होते, सुजले होते आणि खूप दुखायला लागले होते. खरं तर उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असतो. त्यामुळे वातावरण इतकं तापलेलं असतं की- सहसा शीत गुणाच्या वात दोषाला डोकं वर काढता येत नाही. त्यामुळे हा काही वातविकारांचा काळ नव्हे. हा! आता पूर्वीपासूनच ज्यांना सांधेदुखी आहे, त्यांनी खूप गार पदार्थ खाल्ले, खूप गार पंख्याच्या हवेत िंकवा एसीमध्ये बसले तर वेदना उफाळू शकतात. पण हिला आधी सांधेदुखी नव्हती. नोकरी नाही आणि घरी एसी नाही. पंखा म्हणे दोनवरच ठेवते. मग हे झालं कशानं? आयुर्वेदात आजाराच्या कारणानुसार चिकित्सेची दिशा ठरते. कारणच नाही सापडलं तर अंधारात तीर मारल्यासारखे उपचार करावे लागतात. म्हणून मी तिला खोदून खोदून वेगवेगळे प्रश्न विचारत होते. पण काहीच हाती लागेना.
 
 
 
इतक्यात गाडी पार्किंगच्या कामात अडकलेला तिचा नवरा, पार्किंगला जागा मिळवण्यात यशस्वी होऊन माझ्यासमोर येऊन बसला.
‘‘ते सांगितलं का तू मॅडमना?’’ त्यानं बायकोला विचारलं.
‘ह!’ तिनं म्हटलं तर दुर्लक्षच केलं.
आमचं बोलणं चालू असताना त्यानं तीन-चार वेळा तोच प्रश्न विचारला आणि तिनं तितक्याच शिताफीनं दुर्लक्ष केलं. मग मीच न राहवून तिला विचारलं- ‘‘कशाबद्दल बोलताहेत ते?’’
‘‘तसं फार विशेष काही नाही.’’ ती म्हणाली.
‘‘नाही कसं? आणि तूच परस्पर ठरवतेस होय?’’ नवर्‍याचा संयम संपला असावा.
‘‘अहो, ही ना रोज दुपारी फरशीवर पाणी मारून त्यावर झोपते, गरमी सहन होत नाही म्हणून! त्यानं पेपर फाडून टाकला.
बापरे! हा उपाय कुठून शोधून काढलात? आणि लपवताय्‌ काय माझ्यापासून?’’ मी शब्दशः भंजाळले.
ही काय गमतीशीर मानसिकता असते रुग्णांची माहीत नाही. वैद्यापासून आपल्या चुका लपवून कसं चालेल?
‘‘पहिल्यांदा बंद करा हे सगळं. इतकं सहन न व्हायला काय झालं? खानदेशात, विदर्भात लोकं पन्नास डिग्री सहन करतात. आणि ही असली संकटं ओढवून घेण्यापेक्षा ते थोडं सहन केलेलं परवडत नाही का? नफातोट्याचा हा हिशोब लोक मुळात मांडतच नाहीत ही मुख्य अडचण असते.’’
त्या रुग्णाला आवश्यक ते उपचार चालू केल्यावर वेदना कमी झाल्या खर्‍या, पण मुळात अशी दुखणी शक्यतो आपल्या वाट्याला येऊ नयेत म्हणून काळजी घ्यायला नको का? (या रुग्णेपासून, सांधेदुखीच्या रुग्णांना, फरशीवर गार पाणी मारून झोपता का हा प्रश्न मीच विचारू लागले.) त्यासाठी काय करायचं ते सांगायला आम्ही वैद्य तयार असतो ना! लोकांनाच नियम पाळायचा कंटाळा! इतके दिवस इतकी माणसं करतात या चुका. त्यांना कुठे काय होतं? असे तद्दन अतार्किक प्रश्न आम्हालाच विचारतात लोक.
उन्हाळ्यात आपण गरमीनं हैराण होतो, अंतर्बाह्य गारवा हवासा वाटतो हे मान्य! या ग्लोबल वार्मिंगनं तर जीव मेटाकुटीला आणलाय्‌. पण म्हणून आपल्यावर अनारोग्य रुपी संकट येईल, असं वागायचं? सतत ढणाढणा चालणारे पंखे, हाडांना देखील गार वाटेल इतका एसीचा गारठा, चार-पाच वेळा गार पाण्याची आंघोळ, हे असं जमिनीवर पाणी मारून त्यात डुंबणं. हे सांध्यांना, मणक्यांना, फुफ्फुसाला, स्नायूंना अत्यंत घातक आहे. सतत थंड पाणी फेकणारा एयर कुलर तर हमखास बाधतो.
मग याला पर्याय काय? वाळ्याचे पडदे... मस्त गार आणि सुगंधी असतात. मातीच्या िंभती देखील उन्हाळ्यात गार असतात. काचेच्या आणि सिमेंटच्या इमारती हे सुख देत नाहीत. त्या अंतर्बाह्य तापतात.
मोठमोठ्या निवासी संकुलाचे ग्रीनरीच्या नावाखाली जी खुरटी हिरवळ असते, ती उन्हाळ्यात गारवा द्यायला अजिबात उपयोगी नसते. तिथे मोठी झाडंच कामाची असतात. ती आज लावली तर दहा वर्षांनी सावली देतील. पण आपल्याला मूलभूत, कायमचे आणि न बाधणारे उपाय नको असतात. कारण ते कष्टाचे असतात. त्यापेक्षा आपण तात्पुरते उपाय अंगीकारतो.
शास्त्र सांगतं की- उन्हाळ्यात शरीरात वात दोष साठायला सुरुवात होते. परंतु वातावरणात असलेली प्रचंड उष्णता या वाताला आजार निर्माण करण्याची शक्ती मिळू देत नाही. पुढे पावसाळ्यात वातावरणात गारवा आला की तो या उन्हाळ्यात वाढून आणि दबा धरून बसलेल्या वाटला बळकटी देतो आणि वाताचे आजार डोकं वर काढतात. जर असे आजार उन्हाळ्यातच शिरजोर होत असतील तर याचा अर्थ रुग्ण थंड वातावरणात राहून वाताला मदत करतोय्‌ असाच होतो. हे टाळायला हवं.
ऋतू असू दे थंड अथवा गरम।
मनुष्यानं थोडं करावं सहन।।
दंड थोपटून ऋतुविरुद्ध।
करू नये सुरू आरोग्याशी युद्ध।।
• वैद्य सुचित्रा कुळकर्णी
(च.ऊ. आयुर्वेद, इ.. योगशास्त्र)
चिकित्सक, लेखिका, व्याख्याता, समुपदेशक