लावणीचा वारसा
   दिनांक :05-Apr-2019
मुनाबाईंनी आपल्या लावणीचा वारसा महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षाला दिला आहे. भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार यमुनाबाई वाईकरांना लाभले. पारंपरिक अदेची लावणी सादर करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांची लावणीची कारकिर्द अतिशय तेजस्वी होती. लावणीच्या इतिहासात यमुनाबाईंचं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल. कारण कथ्थकचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नर्तक पंडित बिर्जू महाराज यांच्यासोबत लावणीचे कार्यक्रम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

यमुनाबाई लहान होत्या, तेव्हापासून गाणे म्हणत होत्या. त्यांची आई गीताबाई त्यांना गाणं शिकवायची. त्या तमाशात तुणतुणं वाजवायच्या आणि घरोघरी गाणी म्हणून भिक्षा मागायच्या. यमुनाबाई आईंचं गाणं हुबेहुबू म्हणायच्या. यमुनाबाई मुंबईला त्यांच्या नातेवाईकांकडे चार पैसे मिळावे या दृष्टिकोनातून आल्या होत्या. कुटुंबात मोठे असल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. 15-16 वर्षांच्या असताना त्यांनी संगीत बारी चालू केली. पहिल्यांदा त्या पिलाहाऊसला नाचल्या. त्यापूर्वी नायगावला असताना रस्त्यावर म्हणजे लालबाग, भुलेश्वर अशा ठिकाणी कार्यक्रम करायच्या. पिलाहाऊसला त्या स्वतः गेल्या आणि त्या थिएटर मालकाला बारी लावायला सांगितली आणि त्या तिथे नाचायला लागल्या. यमुनाबाई रत्नागिरीपासून गावोगाव कार्यक्रम करत फिरायच्या. त्यावेळी त्यांची बहीण गरोदर होती. रस्त्याने जात असताना बहिणीला कळा येऊ लागल्या व तिचं बाळंतपण करण्यासाठी जवळपास पाणीही नव्हतं. अखेर त्यांनी डबकातल्या पाण्यानेच त्या मुलाला अंघोळ घातली. पण ते मूल मेलेलं निघालं. त्यावेळी मेलेलं मूल गाडण्यासाठी त्या गावातल्या सरपंचाची तलाठ्याची परवानगी घ्यावी लागायची. मग रात्रभर तिथं राहून त्यांनी गावातल्या तलाठ्याची परवानगी घेतली व त्या मुलाला गाडून दुसर्‍या गावाला गेल्या. इतकं खडतर आयुष्य तुम्ही काढलेल्या यमुनाबाईंना पिलाहाऊसला आल्यानंतर सुखाचे दिवस आले. पिलाहाऊला त्यांच्यासोबत कमळाबाई जयिंसगपूरकर, हौसा-लक्ष्मी-मंजुळा कोल्हापुरकर या त्या काळातल्या बाया होत्या.
लावणीचे प्रकार आहेत. बालेघाटी लावणी, छक्कड चौकाची लावणी, बैठकीची लावणी, पंढरपुरी लावणी म्हणजे त्या परिसरातील अध्यात्मिक लावणी! पण त्यांचा तो भाग नसल्यामुळे अध्यात्मिक लावणीचा यांचा फारसा संबंध आला नाही. पूर्वी लावणी करणार्‍या ज्या बाया होत्या त्यांना शिक्षण त्यांच्या आईकडून िंकवा त्यांच्या सहकार्‍यांकडून कुठनही मिळायचं पण ते मिळवल्यानंतर त्या आत्मसात करून घ्यायच्या. आत्मसात केल्यानंतर काय व्हायचं की गाण्यातील जे शब्दातील भाव आहेत ते चेहर्‍यावर उमटायचे आणि चेहर्‍यावर ते भाव उमटल्यानंतर जे रूप दिसायचं ते अतिशय गोंडस दिसायचं पण इतर बायांपेक्षा यमुनाबाईंच्या लावणी सादरीकरणाच एक वैशिष्ट्य होतं की- त्यांच्या सादरीकरणात नजाकत होती. यमुनाबाईंना ढोलकी फडाच्या तमाशाची आवड होती. आपला पण ढोलकी फडाचा तमाशा असावा, असं त्यांना वाटायचं. अखेर त्यांनी तो फड काढला. पण पाच वर्षांनंतर तो बंद केला.
भटका कोल्हाटी समाज स्थिर करण्याच्या दृष्टीने यमुनाबाईंनी एक मोठं काम केलं. सुशीलकुमार िंशदे सांस्कृतिक मंत्री असताना एकदा यमुनाबाईंच्या एका कार्यक्रमाला आले होते. सुशीलकुमारांनी पाडवींना सांगितल्यानंतर पाडवींनी त्यांना एक प्लॉट दिला आणि यमुनाबाईंच्या अध्यक्षतेखाली एक सोसायटी स्थापन केली. त्या सोसायटीत 60 रुपयांत सगळ्यांना सभासद केलं आणि नंतर सरकारी खर्चातून त्यांच्या समाजाची शंभर एक घरांची सोसायटी उभी राहिली. अशा प्रकारे कलेच्या माध्यमातून तुमचा नावलौकिक झाल्यानंतर समाज स्थिर करण्याच काम त्यांनी केलं.
त्यांच्या समाजात वारकरी सांप्रदायाची अनेक मंडळी होती, त्यांच्यासाठीही यमुनाबाईंनी मोठं काम केलं. सर्वप्रथम यमुनाबाईंनी वाईमध्ये मंदिर उभारलं. त्यामुळे सांप्रदायिक समाज निर्माण झाला. वारकरी निर्माण झाले. पुढे आळंदीला गेल्यानंतर त्याठिकाणी जागा नव्हती. उघड्यावर झोपायच्या. मग बुवा कावळेंसारखी काही मंडळी त्यांच्याकडे आली.
अन्य काही दानशूर मंडळी एकत्र येऊन आळंदीमध्ये मठ उभा केला. व्यसनाधिनतेसारख्या वाईट गोष्टींपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी हे मंदिर उभारलं गेलं. त्यातूनच त्यांच्या समाजात वारकरी निर्माण झाले आळंदी पंढरीची वारी करू लागले. समाज परीवर्तन झालं. यमुनाबाईंनी जयवंत याचं लग्न कोट घालून वरात काढून केलं. कारण इतर समाजाची जशी लग्न होतात, तशी त्यांच्या समाजाची लग्न होत नसत. लग्नात मांसाहार जास्त असायचा. त्यामुळे इतर लोक लग्नात येत नसत. हे सगळं बंद करण्याचं काम यमुनाबाईंनी केलं. त्यांच्या समाजात पंच कमिटी असते त्यात स्त्रीला येऊ देत नसत; पण त्यावेळी यमुनाबाईंचं कर्तृत्व मोठं होतं. त्या महाराष्ट्र कमिटीच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी महाराष्ट्र डोंबारी, कोल्हाटी समाजाच्या संघटनेची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं.
समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा बदलण्याचं कार्य त्यांनी केलं. समाजासाठी शिक्षण निधी उभारला, एवढंच नाही तर त्यांनी आपला मुलगा जयवंत याला एम. ए. पर्यंत शिक्षण दिलं. आज तो मुंबई या ठिकाणी शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहे त्यांचा भाचा बी. कॉम. इंग्लिश मिडीअमचा ग्रॅज्युएट आहे. त्यांची एक नात अंताक्षरी जावळेकर ही थाळीफेकमध्ये राष्ट्रीय खेळाडू आहे. साहजिकच त्यांच्या घराचं अनुकरण समाज करु लागला. आज त्यांचा बहुतांशी समाज सुशिक्षित आहे. हे यमुनाबाईंच्या पुढाकाराने झालं. कारण समाज हा अनुकरण करत असतो बाईंनी पाहिलं. त्यामुळं त्यांनी आपल्या मुलांना शिकवताना इतरानांही शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
असं हे बाईंचं सर्वव्यापी व्यक्तिमत्त्व आहे. यमुनाबाईंच्या जीवनातील ज्या घटना आहेत त्या अनेक प्रसंग निर्माण करणार्‍या आहेत. त्यातून त्यांची निर्णय घेण्याची प्रक्रिया दिसते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून मंदिर बांधले, आळंदी या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, पंचायतीमध्ये महिलांना जाण्याचा अधिकार नसताना पंचायतीत जाऊन न्यायदान केलंस समाजाच्या दृष्टीने समाजप्रबोधनही केलं, भटक्या समाजाला स्थिर करण्याच काम केलं, समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा मोडण्याचं कामं केलं. अशी अनेक कार्ये त्यांच्या नावावर जमा आहेत.
यमुनाबाईंचा 75 व्या वाढदिवसाचा सत्कार पुण्याला होता आणि वसंत बापटांचाही होता. त्यावेळी महिलांचा ऑडिअन्स होता. ज्योत्स्नाबाई भोळेंच्या हस्ते त्यावेळी बाईंचा सत्कार होता. जोत्स्नाबाई त्यावेळी म्हणाल्या- आम्हाला आमच्या तरुण वयात लावण्या पहायला बंदी होती. यमुनाबाईंचे या वयात जर लावण्यांचं. सादरीकरण एवढं. प्रभावी असेल तर तरुण वयात काय असेल? त्यामुळे आम्ही आमच्या तरुण वयात आमच्या समाजाच्या बंदीमुळे एका चांगल्या गोष्टीपासून वंचित रहावं लागलं, असं भोळेबाईंनी जाहीररीत्या सांगितलं.
आणखी एक प्रसंग यमुनाबाईंच्या जीवनात घडलेला सांगावासा वाटतो. तो ऐतिहासिक आहे. दिल्लीला कथ्थक फेस्टिव्हलमध्ये बाईंचा लावण्यांचा कार्यक्रम होता. जागतिक कीर्तीचे नर्तक पं. बिरजू महाराज यांनी येऊन यमुनाबाईंना मिठी मारली आणि म्हणाले- तुम्ही माझ्या आई का झाला नाहीत? हा ऐकीव प्रसंग नाही याला साक्षीदार मी स्वत: आहे. पं. बिरजू महाराजांचा 61वा वाढदिवस त्यांच्या शिष्या प्रभा मराठे यांनी पुण्यात करायचा ठरवले; पण महाराजांनी अट घातली की- मी पुण्याला येतो पण यमुनाबाईंनी ज्या लावण्या सादर केल्या, त्या मला आणून द्या. त्यावर मी नृत्य करणार आहे. यावर यमुनाबाईंनी अट घातली की, लावणी मी गाणार त्यावर तुम्ही नाचायचं. मग बिरजू महाराज म्हणाले- मी नाचेन; पण नंतर मी ठुमरी गाईन त्यावर तुम्ही अदा करा. लावणीला ठुमरी बरोबरचा सन्मान मिळणं हा ऐतिहासिक प्रसंग होता.
नीलेश जठार