ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; मिशेलने काँग्रेसच्या बड्या नेत्याचे सांगितले नाव
   दिनांक :05-Apr-2019
नवी दिल्ली:
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेल यानं लाचखोरीचा हिशोब असलेल्या 'डायरी'त नोंद केलेल्या संक्षिप्त नावांचा खुलासा केला आहे. त्यासंबंधीची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात देण्यात आली आहे. मिशेलने काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे नाव सांगितले आहे, असा दावा ईडीने या आरोपपत्रात केला आहे.
 

 
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात ईडीनं गुरुवारी चौथं आरोपपत्र दाखल केलं. मिशेलच्या माहितीनुसार, डायरीत नोंदवलेल्या 'फॅम' या संक्षिप्त नावाचा अर्थ फॅमिली म्हणजेच कुटुंब असा आहे. तसंच डायरीत नोंद केलेल्या संक्षिप्त शब्दांचा संबंध हवाई दलाचे अधिकारी, नोकरशहा, संरक्षण मंत्रालयातील अधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या लाचप्रकरणाशी आहे, असं ईडीनं म्हटलं आहे.
मिशेलच्या माहितीनुसार, 'एपी' हे एका नेत्याचं नाव आहे. तर 'फॅम' म्हणजे एक कुटुंब आहे, असा ईडीचा दावा आहे. या पुरवणी आरोपपत्रात आणखी तीन नावांचा समावेश केला आहे. त्यात मिशेलचा बिझनेस पार्टनर डेव्हिड सिम्स आणि त्यांचा मालकी हक्क असलेल्या दोन कंपन्या आहेत.