हेमामालिनींनी शेतात चालविला ट्रॅक्टर
   दिनांक :05-Apr-2019
नवी दिल्ली:
 
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात सर्वत्र चांगलाच जोर पकडला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. अशातच भाजपाच्या उमेदवार आणि अभिनेत्री हेमामालिनी आपल्या मतदारसंघात अनोख्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. गेल्या रविवारी प्रचारादरम्यान शेतात गव्हाचे पीक कापताना शेतमजूर महिलांसोबत त्या दिसल्या होत्या, तर काल चक्क ट्रॅक्टर चालवताना त्या दिसून आल्या. दरम्यान, यासंबंधीचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत.
 
 
 
उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून हेमामालिनी आगामी लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हेमामालिनी यांनी मथुरा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या रविवारी हेमामालिनी यांनी आपल्या प्रचारादरम्यान गोवर्धन परिसरातील एका शेतात गव्हाचे पीक कापताना शेतमजूर महिलांसोबत दिसल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी भाजपा कार्यकर्त्यांसह मांट परिसरातील एका गावात प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी एका शेतात ट्रॅक्टर चालविला. तसेच, बटाटा पिकासंदर्भात शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या.
 
हेमामालिनी यांनी २००४ मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्या २००३ ते २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्य होत्या. २०१४ लोकसभा निवडणुकीत हेमामालिनी मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा त्यांना भाजपाने मथुरा याच मतदार संघातून रिंगणात उतरविले आहे.