साई (ई) गावकर्‍यांच्या मतदानावर बहिष्कार
   दिनांक :05-Apr-2019
 
 
 
नाला सरळीकरणाची मागणी
महागाव: तालुक्यातील काळीदौलत जिल्हा परिषद सर्कलमधील साई (ईजारा) येथील नाला सरळीकरण करण्याची गावकर्‍यांनी मागणी केली आहे. गावाला लागून असलेल्या नाल्यामुळे पावसाळ्यात गावात पाणी शिरत आहे. त्यामुळे नाल्याशेजारी असलेले शेतकरी माधव भांगे, रामराव भांगे, प्रल्हाद लोखंडे, देवानंद भांगे, रमेश भांगे, सुदर्शन भांगे यांचे प्रचंड नुकसान होत आहे. पाण्यामुळे जमिनी खरडून जात असून प्रत्येक वर्षी किमान साठ ते सत्तर एकर जमिनीवरील पिकांना त्याचा फटका बसत आहे.
गुलाब जाधव, प्रमोद जाधव, भाऊसाहेब लोखंडे यांच्यासह अनेक गावकर्‍यांनी नाला सरळीकरण करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून गावकर्‍यांनी वेळोवेळी ही मागणी रेटून धरली आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. साई हे गाव तालुका महागाव, ग्रामीण पोलिस ठाणे पुसद, विधानसभा पुसद आणि लोकसभेकरिता यवतमाळ-वाशीम मतदारसंघामध्ये विभागलेले आहे. त्यामुळे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे गावकर्‍यांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून या संदर्भात महागाव तहसील कार्यालयात एक लेखी निवेदन दिले आहे.