मारुती ओमनीचे उत्पादन बंद; ३५ वर्षे दिली सेवा
   दिनांक :05-Apr-2019
नवी दिल्ली:
 
देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती कंपनी असलेल्या मारुतीने ३५ वर्ष जुन्या मारुती सुझुकी ओमनी या मॉडेलचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

 
 
ओमनी ही चारचाकी गाडी भारतात अतिशय लोकप्रिय आहे. ३५ वर्षांनंतरही विक्रीच्या संदर्भात ओमनीची कामगिरी अतिशय चांगली राहिली होती. ही गाडी विकत घेणार्‍या ग्राहकांना  आपल्या सोयीनुसार मॉडेल निवडण्याचा पर्याय होता; पण कंपनीने नव्या रस्ते सुरक्षा नियमाच्या अनुषंगाने आता या गाडीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मारुती सुझुकीची पहिली कार मारुती ८०० ही १९८३ मध्ये बाजारात आल्यानंतर, एका वर्षातच १९८४ मध्ये ओमनी भारतीय बाजारात आली होती.
 
कंपनीने ओमनी कारला नव्या नियमानुसार अद्ययावत केले नाही, त्यामुळे कंपनीने तिचे उत्पादन बंद केले आहे. या मॉडेलला बाजारात अजूनही चांगली मागणी होती. ऑक्टोबर २०१८ पर्यंत कंपनीने ओमनीचे १.५७ कोटी मॉडेलची विक्री केली होती.
 
नवी इको मारुती सुझुकी
 
कंपनीने अलीकडेच मारुती सुझुकी इको भारतीय बाजारात आणली आहे. या कारमध्ये रिव्हर्स पार्किंग, को-ड्रायव्हर सीट बेल्ट यासारखी सुरक्षा वैशिष्ट्य देण्यात आली आहेत. सरकारद्वारे काही सुरक्षाविषयक नियम अनिवार्य केल्यानंतर अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या जुन्या कारचे उत्पादन बंद केले आहे. नव्या सुरक्षा नियमानुसार मारुती सुझुकीने अॅशले ही व्हॅन आवश्यक सेफ्टी फीचर्ससह बाजारात आणली. सुरुवातीला या मारुती इकोची शोरूमबाह्य किंमत ३.५५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.