गृहिणीमाहात्म्य...
   दिनांक :05-Apr-2019
रवा एक ऐतिहासिक चित्रपट पाहात होते. त्यातल्या राणीला दागदागिने घालून देणे, तिची वेणी घालून देणे, अगदी आंघोळसुद्धा तिच्या दासी करून देत होत्या. माझा मुलगा म्हणाला, ‘‘काय हे आई, या राण्यांना काहीच कामं नाहीत. त्यांची सर्व कामं करायला दासी. त्यांना नुसतं बसून कंटाळा नसेल येत का? आणि असं काही न करता राहणं किती बोअरिंग...’’ मी त्याला म्हणाले, ‘‘आजच्या फुटपट्‌ट्यांनी त्या वेळी आयुष्य मोजायची नसतात. त्या वेळी परिस्थिती वेगळी, त्यांचे ताणतणाव वेगळे आणि आजही अतिश्रीमंत बायकांना काहीच काम नसते.’’
आज रोजगाराच्या क्षेत्रात काय स्थिती आहे? खेड्यात काही अपवाद वगळल्यास सर्व स्त्रिया कामावर जातात. त्यांना काम करणे अपरिहार्यच असते. झोपडपट्टीतील स्त्रियाही काही ना काही काम करीतच असतात; िंकबहुना संपूर्ण कुटुंबच त्यांच्यावर अवलंबून असते. बहुतेक वेळा त्यांचा नवरा आपले पैसे दारूत उडवितो. जसजशी आर्थिक संपन्नता वाढत जाते, तसतशी काम करणार्‍या महिलांची संख्या कमी होते.

मानवेतिहासाच्या सुरुवातीला स्त्री-पुरुष दोघंही शिकार करीत, भटकत. पुढे गर्भारपण, बाळंतपण आणि मुलांची देखभाल यामुळे स्त्रीला एका ठिकाणी राहावे लागे. त्या काळातच तिने शेतीचा शोध लावला. पशुपालन आणि शेती हे केवळ स्त्रियांचेच प्रांत होते. पुरुष शिकारीसाठी बाहेर जात असत. पण, जसजसा संस्कृतीचा विकास झाला, तसतशा स्त्रिया रोजगारापासून दूर फेकल्या गेल्या.
सतराव्या शतकात भांडवलशाहीचा उगम झाला. त्यातून खाजगी आणि सार्वजनिक अशी विभागणी झाली. भांडवलशाहीचे परिणाम सर्व स्त्रियांवर सारखेच न होता आर्थिक स्तरानुसार वेगवेगळे झाले. या सुमारास उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांची सक्रिय, सबळ अशी प्रतिमा बदलून, उदासीन व परावलंबी झाली. सुखासीन गृहिणी ही कल्पना फक्त सधन स्त्रियांसाठीच शक्य होती. पाश्चिमात्य अभ्यासक कॅथरीन हॉलच्या म्हणण्यानुसार, भांडवलशाहीच्या विकासप्रक्रियेतच िंलगाधिष्ठित श्रमविभागणी स्पष्ट झाली. व्हिक्टोरीयन मध्यमवर्गातून आदर्श गृहिणीची व्याख्या करण्यात आली. त्या काळात बाहेरच्या स्पर्धात्मक वातावरणाला तोंड देण्यासाठी पुरुषांसाठी घरात आल्हाददायक वातावरण पुरवणं, हे कुटुंबाचं प्रमुख कार्य होतं. भावनिक आधार पुरविण्याची नवीन जबाबदारी सधन स्त्रीच्या वाट्याला आली. अर्थात, व्हिक्टोरीयन स्त्रीला मिळणारा मोकळा वेळ कामगारवर्गातल्या स्त्रीच्या शोषणाशी जोडलेला होता.
ऐतिहासिकदृष्ट्या भारतात गृहिणी ही संकल्पना इंग्लिश व्हिक्टोरीयन मूल्यांमधून घडविली गेली. वसाहतवादी काळात भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी गृहिणी ही संकल्पना आणखी पक्की झाली. गृहिणी या संकल्पनेतून कष्टकरी स्त्रिया वगळल्या गेल्या. गृहिणींसाठी अिंहसा, प्रेम, स्वार्थत्याग ही आदर्श मूल्यं मानली गेली, जेणेकरून त्यांनी घरात पतीसाठी आल्हादायक वातावरण निर्माण करून त्यांचं मन रिझवावं आणि सुपुत्र निर्माण करावेत. त्या काळी अशाप्रकारे प्रतिष्ठा आणि मोठेपणाच्या नावाखाली सधन स्त्रिया घरात कोंडल्या गेल्या. स्त्रियांचे शिक्षणही सुगृहिणी होण्यासाठीच होतं.
सतराव्या शतकात तयार झालेली ही प्रतिमा विसाव्या शतकात कायम राहणं शक्यच नव्हतं. परिस्थितीच्या रेट्यामुळे, यांत्रिकीकरणामुळे, प्रचंड स्पर्धेमुळे, महागाईमुळे एकाच्या पगारात घर चालवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा संसाराला हातभार लावण्यासाठी गृहिणी नोकरदार बनल्या. त्यालाही आता तीन पिढ्या लोटल्या. पूर्वी नर्सेस, शिक्षिका अशा मर्यादित क्षेत्रात दिसणार्‍या स्त्रिया आता सर्व क्षेत्रात दिसतात.
आता ती ‘हाऊसवाईफ’च्या ऐवजी ‘होममेकर’ असते. कारण ती एक घर निर्माण करते. गृहव्यवस्थापन ही दंशागुळे पुरून उरणारी गोष्ट आहे. श्रीमंत बायकांना भलेही स्वयंपाक, धुणीभांडी, केरवारे करावे लागत नसतील; पण नोकरांवर देखरेख, नातलगांशी, मित्र-मैत्रिणींशी संबंध जपण्यासाठी समारंभाला जाणे, अहेर देणे, जमाखर्चाचा ताळेबंद ठेवणे, मुलांचा अभ्यास, पॅरेंटस्‌ मीिंटग, आजारी व्यक्तींची सेवा करवून घेणे, इत्यादी कधीही न संपणारी कामं तिला करावी लागतात. आधुनिक काळात फॅशन, सिनेमा, नाटक, टीव्ही मालिका, बाजारात आलेलं नवीन पुस्तक याविषयीचं ज्ञान अद्ययावत ठेवावं लागतं, जेणेकरून मुलांना आपली आई अडाणी वाटणार नाही. टीव्हीवरच्या जाहिराती पाहून घरातल्यांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करता करता गृहिणीच्या नाकीनऊ येतात. इतकं करूनही नवरा आणि मुलं म्हणणार, ‘‘ती काहीच करीत नाही, घरीच असते.’’ या ‘थँकलेस जॉब’मुळे न्यूनगंड निर्माण होतो. ‘गृहिणींना पगार’ या अर्थाची एक बातमी सप्टेंबर 2013 मध्ये झळकली. त्यावर बरीच भवती न भवती झाली. तत्कालीन केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने असं म्हटलं होतं, ‘पूर्णवेळ गृहिणीपद सांभाळणार्‍या स्त्रियांना नवर्‍याच्या उत्पन्नातील 20 टक्के उत्पन्न मिळावं, यासाठी एक विधेयक तयार करण्यात येत आहे.’ 2011 मधील भारतीय जनगणनेत गृहिणींना ‘नॉन वर्कर’ कॅटॅगरीमध्ये टाकलं आहे. या यादीत गृहिणीच्या जोडीला विद्यार्थी, कैदी, अवलंबून असणार्‍या व्यक्ती, भिकारी, शरीर विक्रय करणारे या सर्वांचा समावेश ‘नॉन वर्कर’ म्हणून केला आहे.
हे सर्व िंचताजनक यासाठी आहे की, स्त्रिया कुटुंबात जी पुनरुत्पादनाची जबाबदारी पार पाडतात, ती कोणत्याही सेवेच्या यादीत िंकवा आर्थिक उत्पन्नात धरली जात नाही. स्त्रिया करीत असलेल्या महत्त्वाच्या कामांमध्ये फक्त मुलांना जन्म देणंच नाही, तर उत्कृष्ट मनुष्यबळाची निर्मिती करणंही आहे. प्रौढांची, वृद्धांची, अपंगांची, आजारी व्यक्तींची काळजीही आहे. स्वयंपाक, स्वच्छता, इत्यादी अनेक कामं ती करीत असते, तरीही ती ‘नॉन वर्कर’ या कॅटॅगरीत मोडते. ही चर्चा सुरू होण्याचं निमित्त झालं 2004 साली, रस्ता अपघातात एक गृहिणी मरण पावली, त्या नुकसानभरपाईच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठानं म्हटलं, ‘‘ती गृहिणी कमावती नव्हती, त्यामुळे तिच्या जाण्यानं कुटंुंबाचं झालेलं नुकसान पैशात मोजता येणार नाही.’’ त्यावरून गृहिणीच्या ‘नॉन वर्कर’ असण्याची चर्चा सुरू झाली.
हे सगळं आठवण्याचं कारण, नुकताच ऑक्सफॅमचा अहवाल आला. त्यात म्हटलं आहे, गृहिणींच्या कामाची िंकमत वर्षाला दहा लाख डॉलर्स आहे. अॅपल कंपनीच्या आर्थिक उलाढालीपेक्षा अधिक किमतीचे काम गृहिणी विनामोबदला करतात. भारतातील महिला जे काम विनामोबदला करतात त्यात घराची देखभाल, मूल सांभाळणे यांचा समावेश आहे. त्यांच्या या मेहनतीचे आर्थिक मूल्य एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या 3.1 टक्के आहे. त्या अहवालात आणखी काही गोष्टी सांगितल्या आहेत : 1) भारतात असमानता असून त्याला स्त्री चेहरा आहे, 2) महिलांना पुरुषांपेक्षा कामाचा मोबदला खूप कमी मिळतो, 3) भारतातील 119 लोक अब्जाधीश असून त्यात केवळ 9 महिला आहेत आणि 4) स्त्री-पुरुष यांच्या वेतनात 34 टक्के फरक आहे.
गृहिणींना काय पाहिजे हे विचारलं तर त्या म्हणतात, ‘‘आम्हाला पैसे नको, मानसन्मान नको. आम्हाला पाहिजे, जराशी कृतज्ञता आणि घरकामात मदत. म्हणजे आम्हीही बाहेरच्या जगात वावरू शकू, स्वत:साठी वेळ काढू शकू.’’
मॅकन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या मते, ‘‘भारतात स्त्री-पुरुषांमधील सामाजिक आणि आर्थिक असमानता आपल्याला दूर करता आल्यास, 2025 पर्यंत आपले राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढू शकते. त्याचे आकड्यात रूपांतर केले तर अर्थव्यवस्थेत 750 दशकोटी डॉलर्सची भर पडू शकते.’’
माधुरी साकुळकर
9850369233