६० महिन्यांतील कामांचे श्रेय जनतेलाच!पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
   दिनांक :05-Apr-2019
- काँग्रेसची आश्वासने म्हणजेच फसवणूकच
 
नवी दिल्ली:
 
मागील ६० महिन्यांच्या काळात माझ्या सरकारने जी काही कामे केली आहेत, त्याचे संपूर्ण श्रेय या देशातील १३० कोटी जनतेलाच जाते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केले.
 
 
 
काँग्रेसने आतापर्यंत फक्त निवडणुका आल्यानंतरच आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. निवडणूक िंजकल्यानंतर त्या आश्वासनांची कधीच पूर्तता केलेली नाही. गेल्या ६० वर्षांच्या काळात काँग्रेसने गरिबी दूर करण्याचे आश्वासन दिले आणि आजही त्याच आश्वासनांचा आधार घेतला जात आहे. यावरून सत्यता लक्षात येईल. मी जनतेकडे फक्त ६० महिने मागितले होते. या ६० महिन्यांतील आमच्या सरकारची कामगिरी समाधानकारक आहे. जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देशाला गतिशील सरकार पाहायला मिळाले. हे सर्व श्रेय जनतेला जाते, कारण त्यांच्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान बोलत होते.
 
या ६० महिन्यांच्या काळात आम्ही अनेक मोठे निर्णय घेतले. संपुआ सरकारविषयी लोकांच्या मनात राग होता. मात्र, आमच्या सरकारची काम करण्याची पद्धत पाहून जनतेच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत, असे मोदी म्हणाले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि मी असे पंतप्रधान आहोत, जे काँग्रेसच्या गोत्राचे नाही. इतर पंतप्रधान मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांचे गोत्र काँग्रेसचे होते. त्यामुळे देशाने पहिल्यांदा काँग्रेसची विचारसरणी नसलेले सरकार पाहिले आणि अनुभवले आहे, असे त्यांनी सांगितले.
हा तर सत्तेचा शॉर्टकट
 
गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा करण्याच्या काँग्रेसच्या  जाहीरनाम्यावरही मोदी यांनी टीका केली. काँग्रेसने ६० वर्षे देशावर राज्य केले. सरकार चालविण्याचा दीर्घ अनुभव काँग्रेसकडे आहे. सरकारी व्यवस्थेची बलस्थाने आणि मर्यादा काँग्रेसला माहीत आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून एका चांगल्या जाहीरनाम्याची अपेक्षा होती. काँग्रेसने जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा निराशजनक असून, या पक्षाचा निवडणुकीतील आश्वासनांचा आजवरचा अनुभव अतिशय खराब आहे. याआधी काँग्रेसने जी आश्वासने निवडणुकीपूर्वी दिली, ती पूर्ण झालेली नाही, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
जवानांविषयी बोलताना विचार व्हावा
 
भारतीय सशस्त्र दलांबाबत जगभरातील देशांना आदर आहे; मात्र, आपल्याच देशातील काही लोकांना जवानांच्या पराक्रमावर  संशय आहे. काँग्रेससारखा मोठा राजकीय पक्ष आपल्या जवानांचा अपमान करीत असतो. ही बाब अशोभनीय आहे. जवानांविषयी बोलताना विचार करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले.
देशविरोधी कारवाया करणार्‍यांवर कारवाई हवीच
 
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. देशविरोधी वक्तव्य आणि कारवाया करणार्‍यांवर देशद्रोहाअंतर्गत कारवाई व्हायलाच हवी. काँग्रेसने देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत सहा हजार लोकांना कारागृहात पाठवले होते. आता हाच पक्ष देशद्रोहाचे कलम हटविण्याची भाषा करीत आहे, असा आरोप मोदी यांनी केला.