स्थूलपणा आणि पोषाहार
   दिनांक :05-Apr-2019
स्थूलपणा या अवस्थेत शरीरातील वसा ऊतकामधे अतिरीक्त चरबी सर्वसाधारणत: साठत जाते. त्यामुळं आवश्यक वजनापेक्षा 20 टक्के अधिक वजन वाढते. स्थूलपणाचे आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होतात आणि त्यामुळं अकाली मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. स्थूलपणा रक्तातील उच्च कोलेस्टेरॉल, हृदयरोग, मधुमेह, पित्ताशयातील खडे आणि ठराविक प्रकारचे कर्करोग यांना कारणीभूत ठरतो.
 
 
 
कारणे
- अतिप्रमाणात खाणे आणि कमी शारीरिक श्रम दोघेही मिळून स्थूलपणा निर्माण करतात.
- ऊर्जेचं ग्रहण आणि ऊर्जेचा खर्च यांच्यात तीव्र असमतोल झाल्यानं स्थूलपणा आणि लठ्ठपणा उद्भवतो.
- आहारातून अतीप्रमाणात चरबी घेण्यामुळंही स्थूलपणा येतो.
- गुंतागुंतीची वर्तणूक आणि मानशास्त्रीय कारणांमुळंदेखील अती अन्नसेवन आणि परिणामी लठ्ठपणा होतो.
ऊर्जेच्या वापरातील चयापाचयिक चुका मेद साठण्यास उत्तेजन देऊ शकतात. बालपण आणि पौगंडावस्थेतील स्थूलपणा यांच्यामुळं प्रौढावस्थेत स्थूलपणा येऊ शकतो. महिलांमधे, गर्भधारणेच्या वेळेस आणि रजोनिवृत्तीनंतर स्थूलपणा येतो.
 
 
 
वजन कसे कमी करावे ?
- तळलेले अन्न कमी खावे.
- फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात खाव्यात.
- संपूर्ण धान्य, हरभरे आणि मोडवलेलं धान्यं यांसारखे तंतुमय अन्न पदार्थ अधिक प्रमाणात खावेत.
- शरीराचं वजन सामान्य पातळीत राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा.
- शरीराचं वजन हळू आणि स्थिरपणे कमी करणे हितकारक.
अती प्रमाणात उपवास करण्यानं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आपल्या शारीरिक कार्यांचा समतोल राखण्यासाठी आवश्यक विविध प्रकारचे अन्न पदार्थ खावेत.
- अन्न थोडे-थोडे आणि नियमित अंतराने खावे.
- साखर, चरबीयुक्त पदार्थ आणि मद्याचे प्रमाण कमी करावे.
- कमी स्निग्धता असलेले दूध घ्यावे.
- वजन कमी करणारा आहार हा प्रथिनांनी समृद्ध आणि कर्बोदकं तसंच चरबी कमी असलेला असावा.