शाहरुख खानला मानद पदवी प्रदान
   दिनांक :05-Apr-2019
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान म्हणजेच किंग खानला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता लंडनमधल्या विद्यापीठानं शाहरूखला मानद पदवी देऊन गौरवले आहे. ‘द युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’कडून त्याला लोककल्याण विषयातील पदवी प्रदान करण्यात आली. साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा दीक्षांतसोहळा पार पडला.
 
 
शाहरूखने मानवी हक्क, न्याय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. त्यानं या कार्यात मोलाचं योगदान दिलं म्हणूनच लोककल्याण विषयातील पदवी अभिनेता, निर्माता शाहरूखला आम्ही प्रदान करत असल्याचं विद्यापीठानं ट्विट करत म्हटलं आहे. शाहरूखनं ही पदवी स्वीकारली आहे.
 
 
शाहरूख खान ‘मीर फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेद्वारे महिला सबलीकरण , पुनर्वसन आणि मानवी हक्कांसाठी काम करतो. पदवी स्वीकारत शाहरूखनं समस्त विद्यार्थी, विद्यापीठाचे आभारही मानले. ‘ कोणतीही मदत आणि दान हे गाजावाजा न करता शांततेत करावं, यातच दात्याचा शुद्ध हेतू दिसून येतो. प्रसिद्धी करून केलेल्या दानाला काहीही अर्थ नसतो असं मी मानतो. मी नेहमीच महिला सबलीकरण आणि वंचितांच्या हक्कांसाठी प्रयत्नशील राहिल’, असं शाहरूख म्हणला.
 
 
शाहरूखनं आपल्या पदवी दानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामुळे निस्वार्थी मदत करण्यासाठी मला प्रेरणा मिळेल असं शाहरूखनं ट्विट करत म्हटलं आहे. यापूर्वी शाहरूखला ‘द युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग’ आणि ‘द युनिव्हर्सिटी ऑफ बेडफोर्डशायर’कडून मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं होतं.