दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले हे काही लोकांना आवडले नाही- पंतप्रधान
   दिनांक :05-Apr-2019
भारताने जेव्हा दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले तेव्हा काही लोकांची झोप उडाली असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील सभेत केले. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले हे काही लोकांना आवडले नाही. दहशतवादी हल्ल्यानंतर मी शांत बसायला पाहिजे होते की, प्रतिहल्ला करायला हवा होता असा सवाल त्यांनी जमलेल्या गर्दीला केला. १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात ते बोलत होते.
 
 
दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले हे काही लोकांना आवडले नाही. भारताने प्रत्युत्तर दिले तेव्हा अशा लोकांची झोप उडाली असे मोदी म्हणाले. जेव्हा पाकिस्तान जगासमोर उघडा पडला तेव्हा या लोकांनी त्यांच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली. ते काँग्रेस, समाजवादी पार्टी किंवा बहुजन समाज पार्टीमध्ये असोत त्यांनी तुमचे आयुष्य आणि भविष्य धोक्यात घातले असे पंतप्रधान सभेमध्ये म्हणाले.
अमरोहमध्ये बऱ्यापैकी मुस्लिम लोकसंख्या आहे. येत्या ११ एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा आहे. मायावती-अखिलेश यांच्या सरकारने दहशतवाद्यांची सुटका केली. त्यांच्याबद्दल दया दाखवली असा आरोप नरेंद्र मोदींनी केला. मागच्या पाच वर्षांच्या सत्ता काळात आपण देशाची मान खाली झुकू दिली नाही. देशाची प्रतिमा आणि सन्मान आणखी उंचावला असे मोदी म्हणाले. संयुक्त अरब अमिरातीकडून मला जो ‘झायेद मेडल’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल मी संयुक्त अरब अमिराती आणि तेथील जनतेचे आभार मानतो. हा मोदीला नव्हे तर भारतीयांना मिळणारा पुरस्कार आहे असे मोदी म्हणाले.