राहुल गांधींच्या कार्यक्रमात ‘मोदी... मोदी...’च्या घोषणा
   दिनांक :05-Apr-2019
- म्हणे... आय लव्ह मिस्टर नरेंद्र मोदी
पुणे:
 
आय लव्ह मिस्टर नरेंद्र मोदी, मला मोदींविषयी राग नाही, पण त्यांनाच माझ्याविषयी राग आहे, असा टोला काँग्रेस  अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला. तसेच, मी कामाशी लग्न केले आहे, असेही त्यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमात  मोदी... मोदी... च्या घोषणा देण्यात आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
 
 
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांची मने वळविण्यासाठी म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. हडपसरमधील लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा येथे पुणे शहर युवक काँग्रेस आणि स्वराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक तरुण-तरुणींनी राहुल गांधी यांना अनेक प्रश्न विचारले, त्याला काँग्रेस अध्यक्षांनी दिलखुलास उत्तरे दिली.
 
आय लव्ह नरेंद्र मोदी, असे राहुल गांधी बोलताच विद्यार्थ्यांनी गलका करीत दाद दिली आणि सभागृहात मोदी... मोदी... अशा घोषणा सुरू झाल्या. संचालन करणार्‍या आरजे मलिष्काने विद्यार्थ्यांना शांत राहण्यास सांगितले. परंतु, राहुल गांधींनी इट्स फाईन...नो प्रॉब्लेम म्हणत आपले मत मांडले. मला खरेच नरेंद्र मोदी आवडतात. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबातच राग किंवा द्वेष नाही. पण ते माझ्यासारखा विचार करीत नाहीत. त्यांना माझ्याविषयी राग आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
 
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येऊ घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे संचालन करणार्‍या सुबोध भावेने राहुल गांधींना बायोपिकबद्दल प्रश्न विचारला. तो म्हणाला की, मला तुमचा बायोपिक बनवायचा आहे. तो चित्रपट मीच दिग्दर्शित करणार आहे. पण त्यामध्ये हिरोईन कोण असावी, असा प्रश्न माझ्यासमोर आहे. यावर राहुल गांधींनीही खुमासदार उत्तर दिले. ते म्हणाले की, दुर्दैवाने मी कामाशी लग्न केले आहे.
 
२० टक्के गरिबांना वर्षाला ७२ हजार देण्याचे आश्वासन तुम्ही दिले आहे. पण न्याय योजनेसाठी निधी कुठून येणार, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने राहुल गांधींना विचारला. त्यावर ते म्हणाले की, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या आणि अनिल अंबानींकडून पैसे घेऊन गरिबांना देणार. मध्यमवर्गीयांचा कर वाढवणार नाही. आम्ही पूर्ण हिशेब केला आहे, पैसा कुठून येणार आणि कुठे वाटप करणार. सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट होईल आणि मग तो संपूर्ण देशात लागू होईल.
 
रोजगाराबाबत राहुल गांधी म्हणाले की, आज देशात दर २४ तासात २७ हजार नोकर्‍या जात आहेत. तर दुसरीकडे चीन सातत्याने आपल्या देशात रोजगाराची निर्मिती करीत आहे. त्यांच्याकडे २४ तासात ५० हजार नोकर्‍यांची निर्मिती होत आहे. आपल्याकडे शिक्षण, व्यवसायात कौशल्याला महत्त्व दिले जात नाही. अमेरिकेत कौशल्य महत्त्वाचे समजले जाते. सुदैवाने आपली तरुणाई सजग आहे, त्यांच्यात क्षमता आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
 
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदीमुळे जीडीपी २ टक्के कमी झाला आहे. लाखो नोकर्‍या गेल्या आहेत. हे नुकसान भरून निघणार नाही. नोटाबंदीनंतर झटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरायला, नवीन उद्योजकांना उभारी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. शिक्षण आणि आरोग्य हे आमच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे राहतील. शिक्षणावर जीडीपीच्या ६ टक्के खर्च केला जाईल.