पाक करणार ३६० भारतीय कैद्यांची मुक्तता
   दिनांक :05-Apr-2019
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ३६० भारतीय कैद्यांची याच महिन्यात चार टप्प्यांमध्ये मुक्तता करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.
या कैद्यांमध्ये ३५५ मासेमार आणि पाच सामान्य नागरिक आहेत. ८ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात १०० कैद्यांची मुक्तता करण्यात येईल, १५ एप्रिलच्या दुसर्‍या टप्प्यात १००, २२ एप्रिलच्या तिसर्‍या टप्प्यात १०० आणि शेवटच्या टप्प्यात ६० कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांच्या हवाल्याने एका दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे.
भारतातील विविध तुरुंगांमध्ये पाकिस्तानचे ३४७ कैदी आहेत. आम्ही भारतीय कैद्यांची मुक्तता करीत असल्याने, भारतही आमच्या कैद्यांची मुक्तता करेल, अशी अपेक्षा फैजल यांनी व्यक्त केली आहे.