न्यायालयाच्या आवारातील फणस तोडल्याने वकील तुरुंगात!
   दिनांक :05-Apr-2019
लखनौ:
 न्यायालयाच्या आवारातील फणस तोडल्यामुळे थेट तुरुंगात जाण्याची वेळ उत्तरप्रदेशमधील एका वकिलावर ओढवली. सदर वकिलाने न्यायालयाच्या परिसरातील फणस तोडल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. या वकिलाचे नाव नीरज चौधरी असे आहे. अटक केल्यानंतर त्याच्यावर फणस तोडण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे लगेचच त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
 
 
 
हा प्रकार उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडला. बस्ती जिल्ह्यात दिवाणी न्यायालय असून, या न्यायालयाच्या परिसरात एक फणसाचे झाड आहे. अॅड. नीरज चौधरी यांनी भल्या पहाटे येऊन या झाडावरचा फणस तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका शिपायाने नीरज यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी शिपायाला विरोध करीत त्याला मारहाण केली. झाल्या प्रकारामुळे शिपाई संतापला व त्याने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
 
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नीरज चौधरी यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याजवळील पिशवीत पोलिसांना एक फणस सापडला. पोलिसांनी त्यानंतर त्यांना अटक केली. चोरीचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात असून, न्यायालयात नीरज यांना हजर करण्यात आले. त्यांना यावेळी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या नीरज तुरुंगात आहेत. बस्तीच्या दिवाणी न्यायालय परिसरातील फणस सर्रास चोरीला जात असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे, हे येथे उल्लेखनीय.