मुस्लिम लीगच्या व्हायरसने काँग्रेसही संक्रमित ; योगी आदित्यनाथ यांचा हल्ला
   दिनांक :05-Apr-2019
डेहराडून:
 
मुस्लिम लीग हा पक्ष एखाद्या व्हायरससारखा असून, या व्हायरसने आता काँग्रेसलाही गवसले आहे, अशा शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी आज शुक्रवारी हल्ला चढविला.
 
केरळमध्ये देशाचे विभाजन करू पाहणार्‍या मुस्लिम लीगसोबत कॉग्रेसने गुप्त समझोता केला आहे. मुस्लिम लीग एक प्रकारचा व्हायरस आहे. असे लोक जिंकले तर देशाचे काय होईल, हा व्हायरस पूर्ण देशात पसरेल, अशी भीती योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.
 
 
 
उत्तराखंडमधील काशीपूर येथे आयोजित रॅलीत बोलताना योगी म्हणाले की, शेकडो वर्षे गुलामगिरीत राहिल्यानंतर देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येलाच देशाचे दुर्भाग्यपूर्ण पद्धतीने विभाजन करण्यात आले. मुस्लिम लीगमुळेच देशाचे विभाजन झाले होते. राहुल गांधींनी केरळच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला असून, त्यांचा मुस्लिम लीगसोबत गुप्त समझोता झाला आहे. देशाच्या विभाजनाचे कारण ठरलेली ही संघटना आहे. काँग्रेसचा मुस्लिम लीगसोबतचा गुप्त समझोता आता देशाला कुठे घेऊन जाणार आणि काँग्रेस देशात कशाप्रकारच्या वातावरणाची निर्मिती करणार, याची मला देखील माहिती नाही.
 
सुरक्षा दलांना विशेषाधिकार प्रदान करणारा अॅफ्स्पा कायदा हटवून, काँग्रेस सुरक्षा यंत्रणांना कमजोर करू इच्छित आहे. काँग्रेसने स्वत:चा आत्मा व स्वाभिमान देशद्रोही आणि फुटीरतावाद्यांकडे गहाण ठेवला आहे. काँग्रेसला फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या इशार्‍यावर काम करायचे आहे, असा आरोपही आदित्यनाथ यांनी केला.