दक्षिणायन...
   दिनांक :06-Apr-2019

विनोद देशमुख
 
अयन म्हणजे जाणे; पुढे सरकणे. दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जातो, त्याला उत्तरायण म्हणतात. हाच सूर्य 21 जूनला कर्क संक्रांतीला कर्क राशीत प्रवेश करून दक्षिणायनाला सुरुवात. सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी 3 एप्रिलपर्यंत उत्तरायणात (उत्तर भारतात) होते. 4 एप्रिलला ते दक्षिणायनात गेले! म्हणजे, दक्षिण भारताच्या केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. आपण दक्षिण भारताचेही प्रतिनिधी आहोत, हे दाखवून देण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. अमेठीत पराभव होऊ शकतो, या भीतीतून राहुलने दक्षिणायन केले, असे त्यांचे विरोधक म्हणत आहेत. ते खरे असावे. नेहरू-गांधी कुटुंबाला संकटाच्या वेळी नेहमीच दक्षिणेची आठवण झाली, असा इतिहास आहे. त्या मालिकेतील हा चौथा प्रयोग आहे, एवढे सांगितले तरी पुरे.

 
1978 आणिबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींना रायबलरेलीच्या मतदारांनी नाकारले. उत्तर भारतातील 300 पैकी फक्त एका जागेवर कॉंग्रेस विजयी झाली. इंदिराजींसाठी सुरक्षित मतदारसंघ आता दक्षिणेतच शोधायचा म्हणून कर्नाटकातील चिकमगलूरचे कॉंग्रेस खासदार चद्रेंगौडा यांनी आपल्या नेत्यासाठी जागा खाली केली, तेव्हा कुठे पोटनिवडणुकीत इंदिराजी लोकसभेत पोहोचल्या.
 
1980. उत्तरेत धोका नको म्हणून इंदिराजी पुन्हा दक्षिणेत गेल्या. यावेळी आंध्रप्रदेशात. मतदारसंघ मेडक. 1984 मध्ये हत्या होतपर्यंत त्या मेडकच्या खासदार होत्या. (त्यांच्यानंतर पी. व्ही. नरिंसहराव- 1991 आणि एच. डी. देवेगौडा-1996 हे दोन दक्षिण भारतीय खासदार पंतप्रधान बनू शकले.)
 
1998. सोनिया गांधींनी कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघ निवडला; पण लवकरच झालेल्या निवडणुकीत (1999) त्या अमेठीला परत गेल्या. अन्‌ आता त्यांचे पुत्र राहुल यांनी केरळ राज्य पसंत केले आहे. फरक एवढाच की, इंदिराजी आणि सोनिया एकावेळी एकाच ठिकाणाहून लढल्या. राहुलने मात्र अमेठीसोबत वायनाड असे दोन मतदारसंघ एकत्र घेतले आहेत.
वायनाडच का, असा प्रश्न अनेकांना पडतो. हा मतदारसंघ 2008 च्या फेररचनेत निर्माण झाला. 2009 आणि 2014 या दोन्ही वेळी कॉंग्रेसचे शानवास जिंकले. त्यांचे गेल्या नोव्हेंबरमध्ये निधन झाले. या मतदारसंघात ख्रिश्चन, मुस्लिम मतदारांची संख्या 49 टक्के आहे आणि डाव्या सत्ताधारी आघाडीत तो भाकपाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळेच डावे चिडले आहेत. या क्षेत्रात भाजपाचे अस्तित्व नगण्य असल्यामुळे राहुलने येथे येणे आमच्या विरुद्धच आहे. त्यांना भाजपाविरोध कमी महत्त्वाचा वाटतो, असा टोला भाकपा नेते प्रकाश कारत यांनी लगावला आहे. डाव्यांचा हा विरोध पत्करून, नक्षलवादग्रस्त वायनाडमध्ये दक्षिण दिग्विजय नोंदविण्याचा राहुलचा मानस दिसतो. एकूण, नेहरू-गांधींची तिसरी पिढी दक्षिणायनाला आली आहे. पण, हे दक्षिणायन असले तरी ते उजवे नाही !!