अवकाशातील लक्ष्यवेध
   दिनांक :06-Apr-2019
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने 27 फेब्रुवारीला इतिहास घडवला. पृथ्वीभोवती खालच्या कक्षेत फिरणार्‍या उपग्रहाचा प्रक्षेपणास्त्राच्या साहाय्याने अचूक वेध घेतला. हा उपग्रह भारतानेच या कक्षेत फिरत ठेवला होता. अवकाशात स्थिर नसणार्‍या लक्ष्याचा वेध प्रथमच घेतला गेला. अवकाश संशोधनाचे हे एक मोठे यश आहे. या यशस्वितेमुळे भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर जगातील चौथा देश ठरला आहे. एकूणच गेल्या पाच वर्षांत भारतीय अवकाश संशोधन संस्थेची कामगिरी अभिमानास्पद राहिली आहे. डीआरडीओ ही संस्था सैनिकी उपकरणांची निर्मिती करते. मात्र, अलीकडच्या काळात क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी ती भारतीय अवकाश संशोधन संस्थेची मदत घेत आहे. जमिनीवरून अवकाशात मारा करण्यासाठी अग्निबाणाची आवश्यकता असते. ही अग्निबाण निर्माण करण्याची क्षमता भारताने कशी मिळवली हे पाहणे उद्बोधक ठरेल.
 
 
 
 
अवकाशात सफर करण्याची मानवाची इच्छा खूप पूर्वीपासून आहे. त्यात पहिले यश आले ते रशियन संशोधकांना. 1961 साली व्होस्टाक-1 या अंतराळयानातून पहिला अंतराळवीर अवकाशात पोहोचला. या अंतराळवीराचे नाव होते युरी गागारीन. त्याने अवकाशयानातून पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घातली. एकशेआठ मिनिटांचा हा प्रवास ऐतिहासिक ठरला. अवकाश हे मानवासाठी एक गूढ होते. अवकाशात पृथ्वीवरील परिस्थितीपेक्षा भिन्न परिस्थिती असल्यामुळे त्याचा मानवावर काय परिणाम होईल, हे माहीत नव्हते. अवकाशात पाठवले जाणारे अवकाशयानही तेवढे अद्ययावत नव्हते. पृथ्वीवर सुखरूप परत येण्याविषयीही साशंकता होती. युरी गागारीनच्या यशस्वी अवकाशयात्रेमुळे या तंत्रज्ञान विकासाला चालना मिळाली. त्याचबरोबर या तंत्रज्ञान विकासात स्पर्धा सुरू झाली. अणुविज्ञान विकासानंतरची ही सर्वात मोठी स्पर्धा होती. तो काळ शीतयुद्धाचा असल्यामुळे अमेरिका आणि रशिया या देशांमध्ये सर्वच बाबतीत चढाओढ सुरू होती. रशियाने प्रथम अवकाशात मानवी सफर घडवून एक पाऊल पुढे टाकले होते. अमेरिकेनेही ते आव्हान स्वीकारले. अवकाश तंत्रज्ञान विकासाचा मोठा कार्यक्रम आखून अमेरिकेने तो यशस्वी करून दाखवला. चंद्रावर मानव पाठविण्याची योजना आखून त्यांनी ती यशस्वी करून दाखवली. नील आर्मस्ट्रॉंग या पहिल्या अवकाशयात्रीने चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास घडवला. रशिया आणि त्यानंतर चीन या देशांनीही या तंत्रज्ञान विकासात आघाडी घेतली.
त्यानंतरच्या काही दशकांत अवकाश तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती झाली. अवकाशात जाऊन पुन्हा पृथ्वीवर परत येणारी अवकाशयाने तयार झाली. अशा अवकाशयानांचा पुन:पुन्हा वापर होऊ लागला. त्यामुळे अवकाश मोहिमांचा खर्च कमी झाला. अंतराळात असणार्‍या वजनविरहित अवस्थेचा उपयोग संशोधनासाठी होऊ लागला. त्यासाठी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राची निर्मिती केली गेली. ही प्रयोगशाळा आता एक दशकाहून अधिक काळ अंतराळात आहे. जगातील प्रगत देश या अंतराळातील प्रयोगशाळेचा उपयोग वजनविरहित अवस्थेचे सजीव आणि निर्जीव पदार्थांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करीत आहेत. या संशोधन केंद्रात अवकाशायात्री सहा महिन्यांहून अधिक काळ व्यतीत करू शकतात. या त्यांच्या वास्तव्यात त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याचेही आढळून आले आहे. हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन ती कमकुवत होणे, पायांमधील स्नायू कमकुवत होणे, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे आणि शरिरातील द्रव वरच्या भागात साचून राहणे यासारखे परिणाम दिसून आहे आहेत. यावर मात करण्यासाठी व्यायामाबरोबरच औषधांचाही वापर केला जात आहे. या कार्यक्रमात पुरुषांबरोबर स्त्रियाही हिरिरीने भाग घेत आहेत. भारतीय वंशाच्या दोन महिला अवकाशयात्रींनी या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स ही ती दोन नावे. कल्पना चावला यांचा अवकाशयानाच्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. त्या अपघातात मृत्यू पावलेल्या अवकाशयात्रींच्या स्मृती केनेडी अवकाश केेंद्रात जपून ठेवल्या आहेत. कल्पना चावलांचे जीवन भारत आणि जगातील असंख्य तरुण-तरुणींना स्फूर्तिदायक ठरले आहे. सुनीता विल्यम्स या दोन वेळा अंतराळात प्रवास करून आल्या आहेत. तिसर्‍यांदा त्यांची अवकाश संशोधन केंद्रात जाऊन राहण्याची तयारी आहे. अवकाशात जाण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक स्थैर्यही उच्च प्रतीचे असावे लागले. भारतीयांमध्ये ते आहे, हे या दोन्ही महिलांनी सिद्ध केले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय अवकाश संशोधन केंद्राने केलेल्या कार्याचा आढावा घेणे सयुक्तिक ठरेल. स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे ठरवले. त्यानुसार अणुऊर्जा विभागाची स्थापना करण्यात आली. डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर अवकाश संशोधन सुरू करण्याची कल्पना डॉ. विक्रम साराभाई यांनी मांडली. त्यानुसार त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यास प्रोत्साहन दिले. त्यानुसार अवकाश संशोधनासाठी एक समिती स्थापन झाली. हे 1960 साल होते. त्या काळी अशी योजना आखणे मोठे धाडसाचे होते. कारण त्या वेळी आपल्या देशापुढे अनेक मूलभूत समस्या होत्या. अन्नधान्याचा प्रश्न बिकट होता. रस्ते, कालवे आणि संरक्षण या क्षेत्रात देश पिछाडीवर होता. याही परिस्थितीत डॉ. विक्रम साराभाईंनी अवकाश संशोधनाचे स्वप्न पाहिले. सुरवातीच्या काळात जागा शोधण्यापासून सुरुवात होती. अंतराळ प्रक्षेपणासाठी पृथ्वीच्या भ्रमणाची अनुकूलता, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम आणि प्रक्षेपणासाठी लागणारा कोन विचारात घ्यावा लागतो. त्यानुसार थिरुअनंतपुरम आणि श्रीहरिकोटा ही दोन स्थळे निवडण्यात आली. डॉ. साराभाई यांनी तरुण शास्त्रज्ञांची टीम तयार केली. ते अगदी साधेपणाने राहत. आपले सहकारी काम करताना वातानुकूलित यंत्राची अपेक्षा करीत नाहीत तर मीही ते वापरणार नाही, अशी त्यांची धारणा होती.
भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. मात्र, प्रक्षेपणासाठी रशियाची मदत घ्यावी लागली. प्रक्षेपणासाठी जो अग्निबाण लागतो त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या इंधनाची गरज असते. असे इंधन तयार करण्याची प्रक्रिया शोधणे आवश्यक होते. त्यानुसार एसएलव्ही-3 या अग्निबाणाची निर्मिती करण्यात येऊन रोहिणी हा पहिला उपग्रह भारताने अंतराळात पाठवला. त्यानंतर पोलर सॅटेसाईल लॉंच व्हेइकल (पीएसएलव्ही) आणि जीओ स्टेशनरी लॉंच व्हेईकल (जीएसएलव्ही) असे दोन अग्निबाण बनविण्यात भारत यशस्वी झाला. त्यासाठी भारताने स्वतंत्रपणे क्रायोजेनिक इंजिनाची निर्मिती केली. उपग्रहांना विशिष्ट दिशा देण्यासाठी लागणारी यंत्रणा गगन आणि इरनस या यंत्रणा विकसित केल्या. त्यानंतर भारतीय अवकाश संस्थेने एवढी प्रगती केली की, विकसित देशांचे उपग्रहही भारत प्रक्षेपित करू लागला. भारतीय शास्त्रज्ञांच्या कष्ट करण्याच्या वृत्तीचा परिपाक म्हणजे प्रक्षेपण खर्च कमीत कमी होणे. भारताने 2008 साली चांद्रयान-1 ही मोहीम यशस्वी केली. या मोहिमेत मानवविरहित यान चंद्राच्या कक्षेत नेऊन चंद्राच्या पृष्ठभागाची निरीक्षणे नोंदवली. त्यातले महत्त्वाचे निरीक्षण हे चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वासंबंधी होते. हे निरीक्षण पहिल्यांदाच नोंदवले गेले. 2014 साली भारताने आणखी एक पराक्रम केला. पहिल्याच प्रयत्नात आपले यान मंगळाच्या कक्षेत पोहोचवले. ही किमया करणारा भारत हा पहिलाच देश होता! त्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने एकामागून एक विक्रम करण्याचा धडाकाच सुरू केला. 18 जून 2016 रोजी इस्रोने एकाच वेळी चोवीस उपग्रह अवकाशात सोडले. हे कमी होते असे वाटल्याने 15 फेब्रुवारी 2017 रोजी एकाच अग्निबाणाच्या साहाय्याने एकशेचार उपग्रह अवकाशात प्रस्थापित करण्याचा विक्रम केला. आता 2022 मध्ये मानवासहित यान अवकाशात सोडण्याची तयारी सुरू आहे.
भारताला पश्चिम आणि उत्तर दिशेकडून नेहमीच धोका राहिलेला आहे. आपला प्रतिस्पर्धी चीनने अवकाश संशोधनात मोठी प्रगती केली आहे. त्याचबरोबर अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग करून संरक्षण यंत्रणा मजबूत केली आहे. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानला हे तंत्रज्ञान पुरविण्यात चीन आघाडीवर आहे. हा धोका ध्यानात घेऊन भारताने डीआरडीओ या संस्थेमार्फत अग्निबाण वापरून क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला. डॉ. अब्दुल कलाम यांच्या अथक परिश्रमातून त्याला मृर्त स्वरूप आले. त्यातून ‘अग्नी’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. पहिल्या टप्प्यात कमी पल्ला असणार्‍या या क्षेपणास्त्राचा पल्ला 2008 मध्ये एक हजार किलोमीटर एवढा वाढविण्यात भारताला यश आले. तोपर्यंत ही स्पर्धा अवकाशात पोहोचली होती. चीन, अमेरिका आणि रशिया त्यात आघाडीवर होते. अवकाशात असणार्‍या उपग्रहांचे अनेक उपयोग आहेत. हवामानावर लक्ष ठेवून वादळांची पूर्वसूचना देणे, दळणवळणासाठी साहाय्य करणे, शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करणे, या विधायक कार्यांबरोबरच विध्वंसक कारवायांसाठी उपग्रहांचा वापर शक्य आहे. इतर देशामधील घडामोडींवर लक्ष ठेवून हेरगिरी करणे हे तर सर्वच देश करतात. विशेषतः सैनिकी हालचालींच्या बाबतीत हे केले जाते. त्याही पुढे जाऊन या उपग्रहांमार्फत अण्वस्त्रांचा उपयोग हा आधिक धोकादायक ठरू शकतो. याला अंतरिक्ष युद्ध िंकवा स्टारवॉर म्हणतात. याबाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर करार झाले असून, अंतरिक्षात क्षेपणास्त्रे न ठेवण्यावर एकमत झाले आहे. असे असले तरी एखाद्या राष्ट्राने हा नियम मोडला तर धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना चीन, अमेरिका आणि रशियाने विकसित केली आहे. पृथ्वीभोवती ज्या कक्षांमध्ये उपग्रह फिरतात त्यांचे तीन भाग आहेत. पृथ्वीपासून दोन हजार किलोमीटर दूर असणार्‍या कक्षेस लोअर अर्थ ऑरबीट म्हणजेच खालची कक्षा म्हणतात. दोन हजार किलोमीटर ते पस्तीस हजार किलोमीटर असणार्‍या कक्षेस मध्यम कक्षा, तर पस्तीस हजार किलोमीटरच्या वर स्थिर कक्षा असे म्हणतात. या कक्षेत फिरणार्‍या धोकादायक उपग्रहांना नष्ट करणार्‍या यंत्रणांना उपग्रह विरोधी (अँटी सॅट) म्हणतात. भारताने अशी यंत्रणा विकसित करून तिचा यशस्वीपणे उपयोग केला आहे. भारताच्या दृष्टिकोनातून हे मोठे यश असले, तरी या तंत्रज्ञानाच्या विकासात भारताला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आता भारताने पृथ्वीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर फिरणार्‍या उपग्रहाचा अचूक वेध घेतला आहे. एक हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता भारताची आहे. चीन, अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत ती कमी आहे. चीन सर्वात अधिक म्हणजे दहा हजार ते तीस हजार किलोमीटर एवढ्या अंतरावर लक्ष्यभेद करू शकतो. हा लक्ष्यभेद दोन प्रकारे करता येतो. जमिनीवरून क्षेपणास्त्र सोडून ते उपग्रहावर आदळून त्याचा नाश करणे. दुसर्‍या प्रकारात त्याच कक्षेत दुसरा उपग्रह सोडून त्यामार्फत लक्ष्याचा वेध घेण्यात येतो. ही पद्धत अधिक गुंतागुंतीची असून त्यात आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग होऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग हा निकामी झालेल्या उपग्रहांना नष्ट करण्यासाठी होऊ शकतो. मात्र, नष्ट झालेल्या उपग्रहांचे तुकडे पृथ्वीभोवती फिरत राहिल्यास हा कचरा धोकादायक ठरू शकतो. त्यासाठी नष्ट केलेल्या उपग्रहांचे भाग पृथ्वीवर पडायला हवेत िंकवा अवकाशात जायला हवेत. या यशामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा वाढणार आहे. पाकिस्तान हे तंत्रज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करेल, हा धोका आहेच. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेमुळे ही क्षमता भारतीय संशोधकांनी कष्टसाध्य प्रयत्नातून मिळवली. ही निश्चितच आश्वासक आणि अभिनंदनीय घटना आहे.
(लेखक हे स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
••