अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज रद्द करा : काँग्रेस
   दिनांक :06-Apr-2019
-माहिती लपवल्याचा आरोप
 
अहमदाबाद:
 भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये काही माहिती लपवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा, अशी मागणीही काँग्रेसने  निवडणूक आयोगाकडे केली आहे.
 
 
 
अमित शाह गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून  सी. जे. चावडा उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना अमित शाह यांनी आपल्या शपथपत्रामध्ये गांधीनगरमध्ये असलेल्या एका प्लॉट आणि मुलाच्या कर्जाबाबत योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांनी आपल्या मालमत्तेची किंमत कमी दाखवल्याचा आरोप काँग्रेसने प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्ताचा हवाला देत केला आहे. शाह यांच्या मालमत्तेची किंमत सरकारी निकषांनुसार ६६.५ लाख एवढी आहे. मात्र, त्यांनी ही किंमत  केवळ २५ लाख रुपये दाखवली आहे. मुलगा जय शाह यांच्या कंपनीसाठी आपली संपत्ती गहाण ठेवून २५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचाही उल्लेख शपथपत्रात नसल्याचे काँग्रेस  उमेदवार सी. जे. चावडा यांनी म्हटले आहे.
भाजपाने आरोप फेटाळले
 
मात्र, भाजपा प्रवक्ते भरत पांड्या यांनी वरील आरोप फे टाळून लावले आहेत. विरोधी पक्ष आणि त्यांचे उमेदवार हे अमित शाह यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी कर्ज चुकते केले असून, गहाण ठेवलेली संपत्तीही परत मिळवली आहे. काँग्रेस कुठलीही पडताळणी केल्याशिवाय आरोप करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.